दिवसभरात ३०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST2020-12-29T04:06:11+5:302020-12-29T04:06:11+5:30
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय सोमवारी गर्दीने फुलून गेले होते. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चलन भरल्यानंतर पुढील ...

दिवसभरात ३०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय सोमवारी गर्दीने फुलून गेले होते. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चलन भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ३ टक्के सवलत मिळणार असल्याचे जाहीर केलेले असताना आज ३०० हून अधिक मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. कोरोनाचा संसर्ग अजून कमी झालेला नाही, हे माहीत असताना देखील नागरिकांनी कार्यालयात गर्दी केली होती. सुटीच्या दिवशीही मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय सुरू होते. ३१ डिसेंबरपर्यंत कार्यालयात अशीच गर्दी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मे महिन्यानंतर हळू-हळू मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्यानंतर व्यवहारांनी चांगलीच झेप घेतली. मागील तीन महिन्यांत १३० कोटींहून अधिकचा महसूल औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतून मिळाला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सवलतीची मुदत असली तरी या तारखेपूर्वी ऑनलाईन चलन भरणा केल्यास पुढील चार महिने ३ टक्के सवलत मिळणार आहे. असे मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक सोहम वायाळ, मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले.
चौकट.
४४ हजारांच्या आसपास व्यवहार
मागील चार महिन्यांत ४४ हजारांच्या आसपास मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत झाले. यातून शासनाच्या तिजोरीत अंदाजे १४० कोटींच्या आसपास महसूल जमा झाल्याचे कळते. ३१ डिसेंबरपर्यंत या आकड्यात मोठी भर पडण्याची शक्यता आहे.