सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:04 IST2018-05-09T13:02:40+5:302018-05-09T13:04:05+5:30
कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत.

सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश
- रऊफ शेख
फुलंब्री ( औरंगाबाद ): तालुक्यात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित शेततळी लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, ३०० हून अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत यंदा ४१३ शेततळे देण्याचे ठरविले होते. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या शेततळ्यांसाठी चांगला प्रतिसाद देत सुमारे ९५७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ८८४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी गत सहा महिन्यांत तालुक्यातील ३०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना शेततळे मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात उत्पादन वाढीमुळे बळीराजाला सुगीचे दिवस येतील, यात शंका नाही.
तालुक्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे.
दरम्यान, फुलंब्री तालुक्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आतापर्यंत ८८४ शेतकऱ्यांच्या शेततळ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना टप्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तालुक्यातील शेततळ्यांमुळे उत्पादन वाढीस मदत होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांनी व्यक्त केला आहे.
शेततळ्याचे फायदे
- पाणलोट क्षेत्राच्या भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
- आपत्कालीन स्थितीत पिकाला पाणी देणे शक्य होते.
- पिकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ.
- चिभड व पाणथळ जमीन सुधारण्यासाठी उपयोग.
- मत्स्यसंवर्धन करून उत्पादन काढले जाऊ शकते.
- पिकावर औषधी फवारणी करण्यासाठी पाणी मिळते.
- दुष्काळ परिस्थितीत जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.