प्रशिक्षणाला ३० कर्मचाऱ्यांची दांडी

By Admin | Updated: December 15, 2014 00:50 IST2014-12-15T00:42:00+5:302014-12-15T00:50:22+5:30

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेतर्फे रविवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

30 workers' stick to the training | प्रशिक्षणाला ३० कर्मचाऱ्यांची दांडी

प्रशिक्षणाला ३० कर्मचाऱ्यांची दांडी

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेतर्फे रविवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला दीडशेपैकी १२० कर्मचारी उपस्थित राहिले. उर्वरित ३० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. हे प्रशिक्षण मतपत्रिका आणि मतपेट्या समोर ठेवूनच देण्यात आले. त्यामुळे छावणीची निवडणूक मतदान यंत्रांऐवजी जुन्या पद्धतीने, म्हणजे मतपत्रिकेवरील चिन्हांवर फुली मारूनच होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आज छावणी परिषदेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी १५० कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते; पण प्रत्यक्षात १२० कर्मचारीच हजर राहिले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर किती वाजता जायचे, काय करायचे, कोणत्या बोटावर शाई लावायची, कुणी आक्षेप घेतल्यास काय करायचे, रजिस्टरमध्ये कोणत्या नोंदी घ्यायच्या आदींविषयी निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आनंद बोबडे, नायब तहसीलदार एस. जी. पोटे आदींची उपस्थिती होती.
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच या मतपेट्या कशा सील करायच्या, मतपत्रिका कशा असतील, त्या फोल्ड कशा करायच्या या विषयीचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे आता छावणीची निवडणूक जुन्याच पद्धतीने होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. छावणीच्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मतपेट्या आणि मतपत्रिकांचाच वापर करण्यात आलेला आहे. २००८ सालची निवडणूकही अशाच पद्धतीने घेण्यात आली; पण अलीकडच्या काळात सर्वच निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा वापर करण्याची परवानगी मागितली होती; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडेही असाच प्रस्ताव सादर केला; परंतु त्यावर अद्याप आयोगाने काहीही कळविलेले नाही.

Web Title: 30 workers' stick to the training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.