३० % नागरिक पाण्यासाठी टँकरवर
By Admin | Updated: April 15, 2016 01:51 IST2016-04-15T01:31:16+5:302016-04-15T01:51:16+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत.

३० % नागरिक पाण्यासाठी टँकरवर
औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत. तेथील साडेनऊ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून ६४९ टँकरद्वारे १३३९ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
चार वर्षांपासून पुरेसा पाऊस झालेला नाही़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेठाक झालेले आहेत. काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे़ विहीर, बोअर हे पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सध्या गंगापूर तालुक्यात असून, आकडा १६६ आहे़ त्यापाठोपाठ पैठणमध्ये १५८, वैजापूरमध्ये १५६ टँकर सुरू आहेत़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात असून, संख्या केवळ २ आहे़ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सोयगाव वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये दिवसागणिक टँकरच्या संख्येत वाढ होत आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी प्रशासनाला ५० ते ७० किलोमीटरपर्यंतचा फेरा मारावा लागत आहे़
ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा सपाटा प्रशासनाकडून सुरू आहे़ सद्य:स्थितीत ४३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे़ यातील २४१ विहिरींवरून टँकरमध्ये पाणी भरण्यात येत आहे़ तर उर्वरित १९३ विहिरींवरून नागरिकांना थेट पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे़ टंचाईची तीव्रता अधिक असल्याने विहीर अधिग्रहणाच्या संख्येतही वाढ होत आहे़