२ हजार रुपये किमतीच्या कूलरला ३ हजार भाडे
By Admin | Updated: May 25, 2016 00:28 IST2016-05-25T00:26:15+5:302016-05-25T00:28:56+5:30
औरंगाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरण कंपनीत अजूनही लहान सहान गोष्टींवर पैशांची उधळपट्टी सुरू आहे.

२ हजार रुपये किमतीच्या कूलरला ३ हजार भाडे
औरंगाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरण कंपनीत अजूनही लहान सहान गोष्टींवर पैशांची उधळपट्टी सुरू आहे. कंपनीच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात उन्हाळ्यापुरते भाड्याचे ४३ कूलर बसविण्यात आले आहेत. मात्र या कूलरचे दीड महिन्याचे भाडे हे त्यांच्या खरेदी किमतीपेक्षाही अधिक आहे. दोन हजार रुपये खरेदी किंमत असलेल्या एकेका कूलरला येथे दिवसाकाठी ६५ रुपये याप्रमाणे प्रत्येकी दीड महिन्याचे तीन हजार रुपये अदा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
वीजचोरी आणि थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. म्हणून वीजचोरी आणि थकबाकी वसुलीच्या कारणावरून कंपनीत उलथापालथ सुरू आहेत.
वीज बिल वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र कंपनीतील अवास्तव खर्च मात्र सुरू आहे. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात सध्या कूलरच्या भाड्यावर अशाच पद्धतीने खर्च केला जात आहे. परिमंडळ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्याच्या आवरणाचे ४३ कूलर बसविण्यात आले आहे. हे सर्व कूलर भाड्याचे आहेत.
यामध्ये काही कूलर लहान तर काही मोठ्या आकाराचे आहेत. सर्व कूलर लोकल मेड आणि लोखंडी पत्र्याच्या आवरणाचे आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे कूलर ४५ दिवसांसाठी भाड्याने घेतले असून प्रत्येक कूलरचे दिवसाचे भाडे ६५ रुपये इतके आहे. म्हणजेच ४५ दिवसांचे एका कूलरचे भाडे हे ३ हजार रुपये इतके होते.
यातील लहान आकाराच्या कूलरची खरेदी किंमतच १५०० रुपये ते २ हजार रुपये या दरम्यान आहे. तर मोठ्या आकाराचे कूलरही अडीच हजार ते तीन हजार रुपये दरात मिळते. असे असताना महावितरणकडून प्रत्येक कूलरला ३ हजार रुपये म्हणजे खरेदी किमतीपेक्षा अधिक भाडे अदा केले जात आहे.
मी औरंगाबादेतील कार्यालयात नुकताच रुजू झालो आहे. कूलरवरील खर्चाविषयी अजून मला माहिती नाही. परंतु मी त्याविषयी माहिती घेईन.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता