कांदाचाळीसाठी अखेर तीन कोटीचा निधी !
By Admin | Updated: August 5, 2016 00:13 IST2016-08-05T00:09:31+5:302016-08-05T00:13:22+5:30
कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते.

कांदाचाळीसाठी अखेर तीन कोटीचा निधी !
कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते. दुष्काळी झळा सोसून कासावीस झालेल्या या शेतकरी जिल्हा कृषी कार्यालयाकडे यासाठी निधीच नसल्याने हैराण झाले होते. कांदा चाळ उभारून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची ही शोकांतिका ैै‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध करून ऐरणीवर आणली होती. अखेर कृषी विभागाला जाग आली असून मंगळवारी जिल्हा कृषी कार्यालयास यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
अलीकडील काळात उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. यामुळेच कळंब तालुक्यासह विविध भागात कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. परंतु मुळात नाशवंत पदार्थ असलेल्या कांदा उत्पादनाबाबतीत बाजारपेठेची उपलब्धतता, साठवणुकीची सोय नसणे, अस्थिर दर याचा मोठा फटका बसतो. विकावा तरी तोटा व ठेवावा तरी तोटा अशी वारंवार स्थिती निर्माण होत असल्याने काढणीपश्चात साठवणुकीची सोय निर्माण गरजेचे झाले होते. यानुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्हा कृषी कार्यालयाने काढणीपश्चात व्यवस्थापन व पणन सुविधा उभारण्यासाठी ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणी प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती.
कळंब तालुक्यात जवळपास ९०० च्या आसपास कांदा चाळींना यानुसार मंजुरी देण्यात आली होती. यातील ५०० च्या आसपास देयके कृषी विभागाला सादर करण्यात आली होती. परंतु उद्दिष्टापेक्षा जास्त मंजुरी दिल्याने प्राप्त निधी अपुरा पडू लागला होता. यामुळे तालुक्यातील केवळ ३० ते ३५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. ऐन दुष्काळात कांदा चाळ उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून मोठा खर्च केला होता. परंतु जिल्हा कृषी कार्यालयाकडे निधी उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. या संदर्भात लोकमतने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या हा प्रश्न निदर्शनास आणून दिला होता. (वार्ताहर)