३ तीव्र,२०१ मध्यम जोखीम पाणीस्त्रोत
By Admin | Updated: May 26, 2014 00:46 IST2014-05-26T00:41:32+5:302014-05-26T00:46:45+5:30
कंधार : एप्रिल महिन्यातील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोताच्या सर्वेक्षणातून ३ पाणीस्त्रोत तीव्र जोखीम असलेले आणि २०१ स्त्रोत मध्यम जोखीम असल्याचे समोर आले आहे़

३ तीव्र,२०१ मध्यम जोखीम पाणीस्त्रोत
कंधार : एप्रिल महिन्यातील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोताच्या सर्वेक्षणातून ३ पाणीस्त्रोत तीव्र जोखीम असलेले आणि २०१ स्त्रोत मध्यम जोखीम असल्याचे समोर आले आहे़ ११६ ग्रामपंचायतीअंतर्गत ४५५ पाणीस्त्रोत नमुने तपासल्यानंतर ही बाब समोर आली. परिणामी शुद्ध पाणी मिळविण्यासाठी मोठी उपाययोजना करण्याचे आव्हान आहे़ १० ते २५ एप्रिल या कालावधीत आरोग्य कर्मचारी व जलसुरक्षक यांनी ११६ ग्रामपंचायतीअंतर्गत पिण्याचे पाणी स्त्रोत तपासणी केली़ पेठवडज, बारूळ, कुरूळा, पानशेवडी व उस्माननगर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २६१ हातपंप-विंधन विहिरी, ७२ नळयोजना, १२२ विहिरींचे पाणी स्त्रोत तपासण्यात आले़ त्यात नळयोजनेचे पाणी तपासताना लगतचा स्वच्छ परिसर, जवळ सांडपाणी, शौचालय-गोठा, जलवाहिनी गळती, जलकुंभ गळती, नळाला तोटी, जलकुंभ स्वच्छता, जलवाहिनी गटाखालून गेली का, ओटी चाचणी घेतली जाते का, पाणीनमुने घेतले जाते का, टीसीएल साठा आदी बाबींवर गुण ठेवून जोखीम निश्चित करण्यात आली़ विंधन विहिरी व हातपंपाचा स्त्रोत तपासताना त्या भोवतालची स्वच्छता, जवळ सांडपाणी, गोठा, सांडपाणी साचणे, सिमेंट फरशीचा आकार, क्लोरीनचे प्रमाण आदी बाबींवर गुण दिले जातात़ तसेच बंदिस्त व उघड्या विहिरीचा पाणी स्त्रोत सर्वेक्षण करताना परिसर स्वच्छता, सांडपाणी, झाकणी, संरक्षक भिंत, कपडे धुणे-आंघोळ केले जाते का, पाणीनमुना घेतला जातो का, क्लोरीनचे प्रमाण आदी बाबी विचारात घेवून गुणांकन केले व त्यानुसार तीव्र, मध्यम व सौम्य जोखीम असलेले पाणी निश्चित केले गेले़ नळयोजना, हातपंप-विंधन विहीर, विहीर अशा ४५५ स्त्रोताचा सर्वे करण्यात आला़ पेठवडज प्रा़आ़ केंद्रांतर्गत २२ ग्रामपंचायतींतील ४२ स्त्रोत मध्यम जोखमीचे व १८ सौम्य आहेत़ बारूळ प्रा़ आ़ केंद्रांतर्गत १९ ग्रामपंचायतीतील १७ मध्यम व ७८ सौम्य, कुरूळामधील २५ ग्रा़ पं़ तील ५२ मध्यम व ५१ सौम्य, पानशेवडीतील ३५ ग्रामपंचायतीतील ५५ मध्यम व ८४ सौम्य, उस्माननगर प्रा़ आ़ केंद्रांतर्गत असलेल्या १५ ग्रामपंचायतीतील ३५ मध्यम व २० सौम्य जोखीम स्त्रोत आढळले़ परंतु पानशेवडी प्रा़ आ़ केंद्रांतर्गत असलेल्या बिजेवाडीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील हातपंपाचा पाणीस्त्रोत तीव्र जोखीम असलेला आहे़ उस्माननगर प्रा़आक़ेंद्रांतर्गत असलेल्या शिराढोण येथील बौद्ध वस्तीतील आड व संगुचीवाडी येथील पांगरा रस्त्यावरील हातपंप तीव्रजोखीम असलेला आहे़ तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ एस़प् ाी़ ढवळे, पर्यवेक्षक एस़ एम़ अली, गटविकास अधिकारी ए़ एस़ कदम, विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वे करण्यात आला़ मध्यम जोखीम असलेल्या पिवळे कार्डधारक ग्रा़ पं़ नी प्रभावी उपाययोजना करून सौम्य जोखीममध्ये येण्याचे आवाहन केले आहे़ तसेच लाल कार्ड हे स्त्रोत पिण्यासाठी धोकादायक असल्याने टाळावे़ तसेच पिवळेसुद्धा धोकादायक असून विशेष काळजी घ्यावी, अन्यथा रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे़ (वार्ताहर) प्रत्येक पाणीस्त्रोतासंबंधी असलेले १० बाबी तपासण्यात आल्या़ तीव्र जोखीम असलेल्या पाणी स्त्रोतासाठी ग्रा़पं़ना लाल कार्ड, मध्यम जोखीम असलेल्यांना पिवळे कार्ड आणि सौम्य जोखीम असलेल्यांना हिरवे कार्ड देण्यात येवून स्वच्छ पाण्यासाठी सूचना करण्यात येणार आहे़