पैठण तालुक्यात मध्यवर्ती बँकेकडून २८ कोटींचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:52+5:302021-07-18T04:04:52+5:30
पैठण : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पैठण तालुक्यात ७४१५ शेतकऱ्यांना २८ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप ...

पैठण तालुक्यात मध्यवर्ती बँकेकडून २८ कोटींचे कर्ज वाटप
पैठण : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पैठण तालुक्यात ७४१५ शेतकऱ्यांना २८ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत आखडता हात घेतला आहे. या बँकांनी किती कर्ज वाटप केले, याबाबतचा आकडा सहायक निबंधकांना देता आला नाही. एकंदरीत राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी सुमारे ५२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ शाखेतून २८ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले, अशी माहिती सहायक निबंधक सहकारी संस्थेचे दिलीप गौंडर यांनी दिली. मार्केट यार्ड शाखा पैठण : ६७५ शेतकऱ्यांना ३ कोटी १७ लाखांचे कर्ज वाटप, बिडकीन शाखा : १००९ शेतकऱ्यांना ३ कोटी ३१ लाख, ढोरकीन शाखा : १,२६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ५१ लाख, दावरवाडी शाखा : १,०८३ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख, विहामांडवा शाखा : ३९२ शेतकऱ्यांना १ कोटी २४ लाख, बालानगर शाखा : ९६२ शेतकऱ्यांना ३ कोटी ५२ लाख, आडूळ शाखा : ८३० शेतकऱ्यांना २ कोटी ८० लाख, साखर कारखाना शाखा : ४८३ शेतकऱ्यांना १ कोटी ७३ लाख, पाचोड शाखा : ११८८ शेतकऱ्यांना ५ कोटी ५१ लाख, लोहगाव शाखा : ६६६ शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाख, चितेगाव २९८ शेतकऱ्यांना १ कोटी ९ लाख, नवगाव शाखा : ३५८ शेतकऱ्यांना १ कोटी १८ लाख, ढाकेफळ शाखा : ३६८ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख, चांगतपुरी शाखा : ३२९ शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
-----
राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नाहीत!
खरिप हंगामासाठी राष्टीयीकृत बँकांनाही कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे; परंतु या बँकेच्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना किती कर्ज वाटले, याची माहिती उघड केली जात नाही. परिणामी, बँकांकडून किती शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले, हे समोरच येत नाही. पीक कर्जासंदर्भात प्रशासकीय स्तरावर होणाऱ्या बैठकीतही बँकेचे अधिकारी माहिती देत नाहीत. जिल्हा प्रशासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसल्याने प्रशासनाच्या आदेशास राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याचे दिसून येते.
-----
लीड बँकेकडे बोट
तालुक्यात कर्ज वाटप किती झाले आहे, याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्थेच्यावतीने राष्ट्रीयीकृत बँकेकडे माहिती मागितली. कर्ज वाटपाची आकडेवारी लीड बँक मॅनेजर यांना आम्ही देत असतो. त्यांच्याकडून घ्यावी, असे उत्तर बँक व्यवस्थापनाने दिले आहे, अशी माहिती सहकार अधिकारी एल. आर. वानखेडे यांनी सांगितले. लीड बँक मँनेजरकडून तालुकानिहाय कर्ज वाटपाची आकडेवारी न देता संपूर्ण जिल्ह्यात केलेल्या कर्ज वाटपाची आकडेवारी देण्यात येते, असे वानखेडे यांनी सांगितले.