जिल्ह्यातील २७ प्रकल्प कोरडेठाक !
By Admin | Updated: August 4, 2014 00:53 IST2014-08-04T00:51:22+5:302014-08-04T00:53:03+5:30
लातूर : राज्यात एकिकडे धो-धो पाऊस बरसून पूरसदृश स्थिती निर्माण झालेली असताना लातूरकडे मात्र पावसाची अजूनही पाठ आहे़ दोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील एकही मोठा, मध्यम व लघुप्रकल्प भरला नाही़

जिल्ह्यातील २७ प्रकल्प कोरडेठाक !
लातूर : राज्यात एकिकडे धो-धो पाऊस बरसून पूरसदृश स्थिती निर्माण झालेली असताना लातूरकडे मात्र पावसाची अजूनही पाठ आहे़ दोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील एकही मोठा, मध्यम व लघुप्रकल्प भरला नाही़ सर्वच प्रकल्पांची क्षमता ६८६ दलघमी इतकी असताना आत्तापर्यंत केवळ ९७ दलघमीच पाणीसाठा झाला आहे़ तोही सिंचन अथवा पाणी पुरवठ्यासाठी पुरेसा उपयुक्त नाही़ शिवाय, २७ प्रकल्पांत तर थेंबभरही पाणी नाही़
पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली नाही़ किरकोळ पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी त्यानंतर मोठा पाऊस झाला नसल्याने आता पिके कोमेजू लागली आहेत़ याहून विदारक चित्र पाण्याच्या प्रकल्पात दिसून येते़ लातूर पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत मोठे, मध्यम व लघु असे एकूण १३९ प्रकल्प आहेत़ परंतु, गेल्या दोन महिन्यात त्यामध्ये पाण्याची पुरेसी भर पडली नाही़ मोठ्या क्षमतेच्या मांजरा प्रकल्पात आजघडीला केवळ २ दलघमी इतकेच पाणी उरले आहे़ तेरणा धरणात ११ टक्के पाणीसाठी असला तरी क्षमतेच्या तुलनेत ते शून्यातच म्हणावे लागेल अशी स्थिती आहे़
जिल्ह्यातील तावरजा व व्हटी हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाक पडले आहेत़ रेणा मध्यम प्रकल्पात ७़७ दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी ३२ टक्के इतकी आहे़ तिरु प्रकल्पात १४़७ (४३%), देवर्जनमध्ये ७़३ (३३%), घरणीत ५़६ (१३%), साकोळ प्रकल्पात २़८ (१०%) तर मसलगा मध्यम प्रकल्पात २़५ दलघमी (१०%) इतकाच पाणीसाठी आतापर्यंत झाला आहे़ लघु प्रकल्पांची अवस्थाही याहून वेगळी नाही़ जिल्ह्यात १२९ लघु प्रकल्प अस्तित्वात आहेत़ त्यापैकी २७ प्रकल्प कोरडेठाक असून ४६ प्रकल्पांमध्ये पाणी जोत्याखालीच आहे़ केवळ दोनच लघु प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे़ त्यात उदगीर तालुक्यातील वागदरीत ६० तर जळकोट तालुक्यात माळहिप्परगा लघु प्रकल्पात ७० टक्के इतके पाणी साठले आहे़ (प्रतिनिधी)
क्षमता ६८६, साठा ९७ दलघमी़़़
१३९ प्रकल्पांत ६८६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठविण्याची क्षमता आहे़ परंतु, आजघडीला यामध्ये केवळ ९७ दसलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा झाला आहे़
ज्याची टक्केवारी १४ इतकी आहे़ २ मोठ्या प्रकल्पांची उपयुक्त क्षमता २६८ असून त्यामध्ये उपयुक्त साठा झालाच नाही़ ८ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त क्षमता १२२ दलघमी असून त्यामध्ये २५ दलघमी पाणी साठले आहे़ तर १२९ लघु प्रकल्पांची उपयुक्त क्षमता २९५ दशलक्ष घनमीटर असताना त्यात केवळ २६ दलघमी इतकाच पाणीसाठा झाला आहे़
या पाण्याचा पुरेसा उपयोग ना सिंचनासाठी होतोय ना पाणीपुरवठ्यासाठी़