२६४ ‘एचएम’ला मिळाल्या शाळा !
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:16:19+5:302014-06-26T00:38:20+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत शाळांवरील अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापकांच्या (एचएम) समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी तालुका स्तरावर पार पडली.

२६४ ‘एचएम’ला मिळाल्या शाळा !
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत शाळांवरील अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापकांच्या (एचएम) समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी तालुका स्तरावर पार पडली. २६४ पैकी २३४ जणांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले. तालुकास्तरावरील प्रक्रियेनंतर अतिरिक्त राहिलेल्या २७ मुख्याध्यापकांचे बुधवारी जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले आहे.
अतिरिक्त मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा प्रश्न मागील काही दिवसांपासून लटकला होता. अखेर या प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला. उस्मानाबाद तालुक्यातील ६३ पैकी ५५ जणांचे समायोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यामध्ये ५९ जण कार्यरत होते. त्यापैकी ४९ जणांचे समायोजन करण्यात आले आहे. येथे आणखी १० जण अतिरिक्त राहिले होते. लोहारा तालुक्यातील २० पैकी १७ जणांचे समायोजन केले गेले. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यात ४० कार्यरत असताना ३२ जणांचे समायोजन करण्यात आले. यातील ८ जण अतिरिक्त राहिले होते. वाशी तालुक्यामध्ये १६ पैकी १० मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले असताना ६ मुख्याध्यापक अतिरिक्त राहिले होते. भूम तालुक्यामध्ये २३ जण कार्यरत होते. त्यापैकी १७ जणांचे समायोजन केले असता, ६ अतिरिक्त राहिले होते. तर परंडा तालुक्यातील १६ पैकी १५ जणांचे समायोजन झाल्याने एक जण अतिरिक्त ठरले होते. २६४ पैकी २३४ जणांचे तालुकास्तरावर समायोजन झाले. उर्वरित मराठी माध्यमांचे २७ आणि उर्दू माध्यमाचा १ अशा २८ मुख्याध्यापकांच्या समायोजनासाठी बुधवारी जिल्हास्तरावर प्रक्रिया घेण्यात आली. सर्व मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाचे उपशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)