२५८ पाणी नमुने दूषित
By Admin | Updated: March 19, 2015 00:18 IST2015-03-19T00:02:26+5:302015-03-19T00:18:44+5:30
बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे.

२५८ पाणी नमुने दूषित
बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे. १००१ पैकी २५८ पाणी नमुने दूषित आढळल्याने सामान्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे? हे देखील समोर आले आहे. पातळी ३०० फुटाखाली गेल्याने अनेक भागांत क्षारयुक्त पाणी येत असून जलजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत महिन्याकाठी पाणीतपासणी होते. विहिरी, बोअरमधील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेचा फेबु्रवारी महिन्यातील अहवाल चिंताजनक आहे. आधीच टंचाईने प्रशासनाच्या नाकेनऊ आले आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेबु्रवारी महिन्यात विविध तालुक्यातील १००१ नमुने तपासणीकरता घेतले होते. त्यापैकी २५८ गावांतील नमुने दूषित असल्याचा निष्कर्ष आला आहे. दरम्यान, टंचाईचा काळ असल्याने जलस्त्रोतांची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच पाणीगुणवत्ता राखताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे.
दूषित पाणी आढळलेल्या ग्रामपंचायतींना शुद्धीकरणासंदर्भात सूचना केल्या आहेत. जलरक्षकांनाही कळविले आहे. उपाययोजना सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार..!
गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार असे विविध आजार दूषित पाणी पिल्याने होऊ शकतात. लहान मुले, वृद्धांसाठी दूषित पाणी सर्वाधिक घातक असते. (प्रतिनिधी)
जलस्त्रोताच्या ५० फूट परिसरात मानवी व गुरांचे मलमूत्र नसावे. गटार नसावे, स्वच्छता हवी. नाल्यांचे पाणी मोकळे करुन द्यावे, स्त्रोतांबरोबरच टाक्यांमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी. वैयक्तिक पातळीवर तुरटी फिरवणे, दहा लिटर पाण्यात लिक्वीड क्लोरिनचे ५ थेंब टाकून पाणी शुद्ध करणे असे उपाय करता येतील. दूषित पाण्याने जलजन्य आजाराची शक्यता असते, त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच उपाय असल्याचे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी सांगितले.
पूर्वी जिल्हास्तररावरुन ब्लिचींग पावडर खरेदी करुन ग्रामपंचायतींना पुरवठा केला जायचा. दोन वर्षांपासून गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतींना पावडर खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, काही ग्रामपंचायती जलशुद्धीकरणासाठी पावडर खरेदी करत नाहीत त्यामुळे दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.