२३५ परवाने रद्द
By Admin | Updated: March 29, 2016 00:53 IST2016-03-29T00:12:02+5:302016-03-29T00:53:51+5:30
औरंगाबाद : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत गेल्या वर्षभरात तब्बल २३५ खत-बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत

२३५ परवाने रद्द
औरंगाबाद : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत गेल्या वर्षभरात तब्बल २३५ खत-बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. विक्रेत्यांनी वेळेत नूतनीकरण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ परवाने हेकीटकनाशक विक्रेत्यांचे आहेत.
कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्यांना कृषी विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. हा परवाना ठराविक मुदतीसाठी असतो. ती मुदत संपण्यापूर्वी त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे असते.
मात्र, बहुतेक विक्रेते वर्षानुवर्षे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत गेल्या वर्षभरात अशा २३५ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे जिल्हे येतात. यातील औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण २३५ मध्ये ८६ परवाने हे कीटकनाशकांचे आहेत. त्यापाठोपाठ ८० परवाने बियाणे विक्रेत्यांचे आहेत.
तर उर्वरित ६९ परवाने हे खत विक्रेत्यांचे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ५३ आणि जालना जिल्ह्यात २७ बियाणे विक्रेत्यांचे परवाने रद्द झाले आहेत. खत विक्रीच्या ६० परवान्यांपैकी ५० औरंगाबाद जिल्ह्यातील आणि १९ जालना जिल्ह्यातील आहेत. त्याप्रमाणे कीटकनाशके विक्रीच्या एकूण ८६ परवान्यांपैकी ६५ परवाने औरंगाबाद जिल्ह्यातील आणि २१ परवाने जालना जिल्ह्यातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नियमानुसार कीटकनाशक व खत विक्रीच्या परवान्याचे दोन वर्षांनंतर तर बियाणे विक्रीच्या परवान्याचे ३ वर्षांनंतर नूतनीकरण गरजेचे आहे.