२२६८ अंत्यविधींचा साक्षीदार हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:01 IST2017-01-03T00:00:08+5:302017-01-03T00:01:19+5:30
अंबाजोगाई :२२६८ जणांच्या अंत्यविधीचे साक्षीदार समाजसेवक लक्ष्मणराव लोमटे यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले.

२२६८ अंत्यविधींचा साक्षीदार हरवला
अंबाजोगाई : जात-धर्म न पाहता सूख आणि दु:खात धावून जाणाऱ्या व तब्बल २२६८ जणांच्या अंत्यविधीचे साक्षीदार समाजसेवक लक्ष्मणराव लोमटे यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
शहरात कोणत्याही समाजाच्या कुठल्याही व्यक्तीचे निधन झाले तर अंत्यविधीचे सोपस्कर पार पाडण्यासाठी ते सर्वात पुढे असायचे. तिरडी बांधण्यापासून ते मुखाग्नी देण्यास मदत करण्यापर्यंत ते पुढाकार घ्यायचे. कधी जिथे मयताच्या घरातील व्यक्ती अथवा नातेवाईक प्रेताला स्पर्श करायला घाबरायचे, तिथे कुठलीही तमा न बाळगता लक्ष्मणरावांनी प्रेताची विटंबना न होऊ देता अंत्यसंस्कार उरकले. कधी-कधी दिवसातून ५-६ अंत्यविधी देखील त्यांनी उरकले. त्यांनी विविध समाजातील तब्बल २२६८ व्यक्तींचे अंत्यसंस्कार पार पाडून समाजसेवेचे वेगळे उदाहरण समोर ठेवले. विशेष म्हणजे याची पूर्ण नोंद त्यांनी करून ठेवली आहे. मागील काही दिवसापासून ते ब्रेन ट्यूमरच्या आजाराने अंथरूणास खिळून होते. सोमवारी पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यसंस्कारासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर)