२२ किलो चांदी जप्त
By Admin | Updated: February 6, 2017 23:04 IST2017-02-06T23:01:05+5:302017-02-06T23:04:25+5:30
बीड : बीड उपविभागात रविवारी रात्री अचानक राबविलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ दरम्यान चऱ्हाटा फाट्याजवळ एका कारमधून २२ किलो चांदी जप्त करण्यात आली.

२२ किलो चांदी जप्त
बीड : बीड उपविभागात रविवारी रात्री अचानक राबविलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ दरम्यान चऱ्हाटा फाट्याजवळ एका कारमधून २२ किलो चांदी जप्त करण्यात आली. रेकॉर्डवरील २७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले असून, तब्बल ११६ वाहनचालकांना दंड करण्यात आला.
अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशावरून उपअधीक्षक गणेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली रात्री ११ ते पहाटे ४ या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. बीड शहर, पेठबीड, शिवाजीनगर, पिंपळनेर, बीड ग्रामीण या पाच ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, १८ फौजदार/सहायक निरीक्षक, ९९ कर्मचारी, वाहतूक शाखेचे १० कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकातील २१ व शीघ्र कृतिदलातील ८ कर्मचाऱ्यांचा ताफा अचानक रस्त्यावर उतरला. ५ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून झडती घेण्यात आली.
चऱ्हाटा फाट्यावर बीडकडे येणाऱ्या कारमध्ये २२ किलो चांदी आढळून आली. कारचालक करमाळा (जि. सोलापूर) येथील रहिवासी असून, त्याच्याकडे चांदीच्या खरेदीची
पावती आढळून आली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांना याची माहिती देण्यात आली. या चांदीच्या संदर्भात निवडणूक विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत. शहरातील १७ लॉजेसची तपासणी यावेळी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर व्यवसाय करणाऱ्या तीन हॉटेल चालकांवर महाराष्ट्र पोलीस अॅक्ट अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोऱ्या, घरफोड्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या पाच जणांना जेरबंद करण्यात आले. ५६ जणांना समन्स, १२ जणांना वॉरंट बजावले, तर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रेकॉर्डवरील २७ जणांना अटक झाली. (प्रतिनिधी)