२१ व्या शतकातील ४५ हजार ५७५ मतदार पहिल्यांदाच करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 19:01 IST2019-03-14T19:01:31+5:302019-03-14T19:01:49+5:30
एकविसाव्या म्हणजेच २००१ साली जन्मलेले मतदार

२१ व्या शतकातील ४५ हजार ५७५ मतदार पहिल्यांदाच करणार मतदान
औरंगाबाद : जिल्ह्यात २१ व्या शतकातील पहिल्या वर्षात म्हणजेच २००१ साली जन्माला आलेले सुमारे ४५ हजार ५७५ नवमतदार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
१८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदारांची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. ९ तालुक्यांचा औरंगाबाद जिल्हा असला तरी यातील फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे तीन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात आहेत. अंदाजे १३ हजार नवमतदार या तीन तालुक्यांत असतील. उर्वरित ३२ हजार नवमतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत. कन्नड, औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य आणि वैजापूर, गंगापूर हे विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २००९ सालीदेखील २३ एप्रिल रोजीच मतदान झाले होते. या निवडणुकीत १८ ते ३० दरम्यान वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाण २३ टक्के आहे. मतदान निर्णायक असणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६ लाख १२ हजार १५३ मतदार २० ते २९ या वयोगटातील असून, १८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीमध्ये सदरील माहिती नमूद करण्यात आली आहे. या नवमतदारांचा कल कुणाकडे आहे, यावर सध्या तर्क विर्तक सुरू असले तरी २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच हे चित्र स्पष्ट होईल.
२ लाख ५० हजार मतदारांचा सहभाग
व्हीव्हीपॅटचा या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रयोग होणार आहे. २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मतदार व्हीव्हीपॅटच्या डेमोत सहभागी झाले होते. ईव्हीएमवर मतदान करून ते बरोबर होते की नाही, याची खातरजमा केली. डेमोत सर्वाधिक सहभाग नवमतदारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.