२००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:49 PM2020-08-12T19:49:20+5:302020-08-12T19:51:43+5:30

ग्रंथपाल दिन विशेष : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा १२ आॅगस्ट हा जन्म दिन. हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

2000 public libraries are closed, class change is not even in the mind of the government | २००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही

२००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१२ पासून ग्रंथालयांना शासनाच्या परवानगीची प्रतीक्षामहाराष्ट्रात अ वर्गाची ३३४, ब वर्गाची २ हजार १२०, क वर्गाची ४ हजार १५३ आणि ड वर्गाची ५ हजार ५४१  ग्रंथालये आहेत.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : महाराष्ट्रातील १२ हजार १४४ सार्वजनिक ग्रंथालयांपैकी सुमारे २ हजारांहून अधिक ग्रंथालये आज बंद अवस्थेत आहेत. त्यांची मान्यता चालू आहे; परंतु ग्रंथालये चालवणे आता परवडण्यासारखे राहिलेले नाही म्हणून ग्रंथालय चालक शासकीय अनुदान घ्यायलाही तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. २०१२ पासून ग्रंथालयांना परवानगी आणि वर्गबदल हे सरकारच्या ध्यानीमनीही नाही. कोरोनामुळे सध्या सगळी ग्रंथालये बंदच आहेत.भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा १२ आॅगस्ट हा जन्म दिन. हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सेवानियम नाहीत...
महाराष्ट्रात अ वर्गाची ३३४, ब वर्गाची २ हजार १२०, क वर्गाची ४ हजार १५३ आणि ड वर्गाची ५ हजार ५४१  ग्रंथालये आहेत. अ-४, ब-३, क-२ आणि ड-१ या पॅटर्ननुसार कर्मचारी संख्या असते. अ आणि ब वर्गातील ग्रंथालये किमान सहा तास व क आणि ड वर्गातील ग्रंथालये किमान तीन तास चालू ठेवणे आवश्यक आहे. या ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या  राज्यातील एकूण २१ हजार ६१३ कर्मचाऱ्यांना ग्रंथालयाच्या वर्गवारीनुसार पगार असून, पाच हजारांहून अधिक पगार कुणालाच नाही. ग्रॅच्युईटी- प्रॉव्हिडंट फंडाची सुविधा नाही. पेन्शन तर फारच लांब राहिले. कुठलेही सेवानियम नसल्यामुळे अलीकडेच पाच कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.  ग्रंथालयांना मिळणारे अनुदान भरीव स्वरूपाचे नाही. अ वर्गातील ग्रंथालयास २ लाख ८८ हजार, ब वर्गातील ग्रंथालयास १ लाख ९२ हजार, क वर्गातील ग्रंथालयास ९६ हजार आणि ड वर्गातील ग्रंथालयास फक्त ३० हजार एवढेच काय ते अनुदान मिळते.

रक्कम व्यपगत होते...
 वर्गबदल आणि नवीन मान्यता बंद असल्याने २०१२ पासून ग्रंथालये शेवटच्या घटिका मोजत आहेत. शिवाय त्या त्या जिल्ह्यात डीपीडीसीत ग्रंथालयांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या रकमाही वितरित केल्या गेल्या नसल्याने व्यपगत होत आहेत. शासकीय ग्रंथालय अधिकाऱ्यांना डीपीडीसीच्या बैठकींना जाऊन हात हलवीत यावे लागते.

पोषक वातावरणाचे काय....
‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. समाजाचा आरसा म्हणून ग्रंथालये कित्येक पिढ्यांपासून ठामपणे उभी आहेत. ग्रंथालयाच्या प्रगतीवरूनच त्या  देशाची प्रगती ठरवली जाते. एरव्ही सारेच जण वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, याची चिंता करताना दिसतात; पण त्यासाठीच्या पोषक वातावरणाचे काय, हा खरा प्रश्न आहे. आहे ती ग्रंथालये शेवटची घटिका मोजत आहेत. आपण मात्र ग्रंथपाल दिनानिमित्त आत्मनिर्भरतेच्या ढेरपोट्या शुभेच्छा देऊन मोकळे होणार.. नवीन शैक्षणिक आराखड्यातील अभ्यासक्रमात तरी ग्रंथालयशास्त्राला प्राधान्य दिले जाईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. 

तीव्र चिंता...
मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव मगर, प्रमुख कार्यवाह भास्कर पिंपळकर, विवेकानंद महाविद्यालयाचे विषय शिक्षक अनिल लहाने, राजगुरू सार्वजनिक वाचनालय, नारेगावचे ग्रंथपाल जगन्नाथ सुभाष सोळंके आदींनी ग्रंथालयांसमोरील वाढत्या अडचणींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे, तर शासकीय विभागीय ग्रंथालयातील ग्रंथपाल सुभाष मुंढे यांनी ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Web Title: 2000 public libraries are closed, class change is not even in the mind of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.