२० स्वच्छता कर्मचाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: July 26, 2014 00:41 IST2014-07-26T00:12:09+5:302014-07-26T00:41:52+5:30
जालना : पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्

२० स्वच्छता कर्मचाऱ्यांची दांडी
जालना : पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी शुक्रवारी सकाळी शहरातून अचानक फेरफटका मारला तेव्हा चार झोनमधील वीस कर्मचारी गैरहजर आढळून आले.
जालना नगर पालिकेत कर्मचारी आठवडाभर संपावर गेल्यानंतर दोन दिवसांपासून कामाला सुरुवात केली. शहरात आठ दिवसाचा मोठ्या प्रमाणात कचरा साचला. अनेक भागात नाल्या तुंबून अस्वच्छता पसरली. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे. त्यातच दोन दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे ही घाण अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे. नाल्या तुडुंब भरल्याने घाण पाणी रस्त्यावर येत आहे. अशी अवस्था शहरात अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील आठ दिवसांपासून शहरात स्वच्छतेची काम ठप्प झाली होती. कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर गुरूवारपासून नियमित स्वच्छतेच्या कामास सुरूवात झाली.
मात्र अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नगर पालिकेच्या वतीने शहरात झोन पद्धतीने स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली. ही कामे व्यवस्थित होतात की नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी शुक्रवारी सकाळी शहर स्वच्छतेच्या कामांची अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान चार झोनमधील २० कर्मचारी गैरहजर आढळून आले.
या सर्व कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला देऊन यापूढे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नगराध्यक्षांच्या या अचानक पाहणीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली.
यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे प्रशासकीय अधिकारी केशव कानपुडे, स्वच्छता निरीक्षक देवानंद पाटील, पंडित पवार, अशोक लोंढे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
आता तरी वेग येईल का ?
जालना पालिकेच्या नगराध्यपदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच नूतन नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी भल्या पहाटेच उठून पालिकेच्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यात २० कर्मचारी गैरहजर हजर आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
सध्या शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे साम्राज्य साफ करण्यासाठी पालिका कर्मचारी वेगाने कामाला लागतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.