२ मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

By Admin | Updated: January 6, 2015 01:13 IST2015-01-06T00:53:39+5:302015-01-06T01:13:37+5:30

औरंगाबाद : आपल्या दोन निरागस चिमुकल्या मुलांचा नाक-तोंड दाबून खून केल्यानंतर पित्यानेही स्वत: आधी हाताच्या नसा कापून घेत आणि नंतर झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली.

2 father's suicide by killing children | २ मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

२ मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या


औरंगाबाद : आपल्या दोन निरागस चिमुकल्या मुलांचा नाक-तोंड दाबून खून केल्यानंतर पित्यानेही स्वत: आधी हाताच्या नसा कापून घेत आणि नंतर झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत घडलेली ही खळबळजनक अन् हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून आलेल्या नैराश्यातून या निष्ठुर पित्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
राम मारुती अहिर (४५, रा. गोरखनगर, चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे त्या पित्याचे नाव आहे. तर वीर (८) आणि अंशुमन (५) अशी आई- बापाच्या वादात नाहक बळी गेलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मयत राम हा वेल्डर होता. तो वेल्ंिडगच्या दुकानात काम करून आपली उपजीविका भागवीत होता. पती, पत्नी, चार मुली आणि दोन मुले, असे त्याचे कुटुंब. त्याच्या दोन मुली विवाहित आहेत. त्या त्यांच्या सासरी राहतात. तर एक अविवाहित मुलगी एका आश्रमात राहते. एक मुलगी, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह राम चौधरी कॉलनीतील गोरखनगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता.
आधी नसा कापल्या... मग फाशी घेतली!
सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चिकलठाणा बाजारतळाजवळच असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली एक व्यक्ती पडलेला असल्याचे तेथून जाणाऱ्या एक जणाच्या नजरेस पडले. पाहता पाहता ही वार्ता गावात पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. तेथे काय झाले पाहण्यासाठी राम अहिरचा पुतण्याही तेथे पोहोचला. तेव्हा खाली पडलेला व्यक्ती आपला काका राम असल्याचे नजरेस पडताच त्याने टाहो फोडला. रामच्या हाताच्या नसा कापलेल्या होत्या. त्यामुळे प्रेताजवळ रक्त पडलेले होते. शिवाय त्याने ‘त्या’ लिंबाच्या झाडाला फाशी घेतल्यानंतर ती फांदी तुटल्याने तो खाली पडला होता; परंतु तोपर्यंत त्याला फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, सिडको एमआयडीसीच्या निरीक्षक निर्मला परदेशी या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. नंतर त्याचे प्रेत उचलून घाटीत पाठविण्यात आले.
घरात चिमुकल्यांची प्रेते
रामचे प्रेत तिकडे सापडल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. दरवाजा नुसता ओढलेलाच होता. पोलिसांनी दरवाजा ढकलल्यानंतर आतमध्ये जमिनीवर टाकलेल्या गादीवर रामचे दोन चिमुकले झोपलेले दिसले. त्यांच्या अंगावर चादर ओढण्यात आली होती. ही चादर बाजूला केली; मात्र दोन्ही मुले उठेनात. त्यांना हालविल्यानंतर वीर आणि अंशुमनही मरण पावलेले असल्याचे आढळून आले. या दोघांचे नाक-तोंड दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पंचनामा करून पोलिसांनी या दोन्ही चिमुकल्यांची प्रेतेही घाटीत रवाना केली.
प्राथमिक तपासाअंती रामने आपल्या दोन्ही मुलांचा पहाटेच्या वेळी उशी किंवा कपड्याने नाक- तोंड दाबून खून केला आणि नंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या. मग बाजारतळाजवळ जाऊन लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली, असे समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नव्हता.
पत्नीच कारणीभूत असल्याचा नातेवाईकांचा आरोप
रामच्या आत्महत्येस आणि त्याच्या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूस त्याची पत्नी ज्योतीच कारणीभूत आहे, असा आरोप रामचे भाऊ आणि बहिणींनी व्यक्त केला. पत्नी त्याला त्रास देत होती.
तिनेच कुणाच्या तरी मदतीने त्याचा काटा काढला. तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.
रामला त्याची पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय होता. गेल्या काही महिन्यांपासून या संशयाने त्याला चांगलेच पछाडले होते. त्यातूनच राम आणि ज्योतीत सतत खटके उडायचे.
४दोन आठवड्यांपूर्वी या दोघांमधील वाद विकोपाला गेला. तेव्हा ज्योती ही आपल्या एका मुलीला घेऊन याच परिसरात बाजूच्याच गल्लीत राहणाऱ्या आपल्या आईकडे वास्तव्यास गेली. वीर आणि अंशुमनला रामने आपल्याकडेच ठेवले.
गेल्या दोन आठवड्यांपासून रामच या दोन्ही मुलांचे संगोपन करीत होता. तो घरी नसताना ही मुले दिवसा आईकडे जात. सायंकाळी पुन्हा वडिलांकडे येत.१
रामने आत्महत्या करण्यापूर्वी तीन कागदाच्या तुकड्यावर सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले. या चिठ्ठीत त्याने मी गेलो तर माझी मुले कुणी सांभाळणार नाहीत, असे लिहून ठेवलेले आहे. शिवाय पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय असल्याचेही त्याने म्हटले आहे. रामने
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन जणांची नावे लिहून ठेवलेली आहेत. त्यातील एक जण दूध विक्रेता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या दोघांचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा रामचा संशय होता, असे सूत्रांनी सांगितले. त्या दिशेने आता तपास सुरू आहे.

Web Title: 2 father's suicide by killing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.