१९८ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:30 IST2016-04-07T23:57:26+5:302016-04-08T00:30:28+5:30
बीड : पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातील.

१९८ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे
बीड : पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातील. त्यासाठी बुधवारी (दि. १३) सोडत पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून १९८ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे दिली जाणार आहेत.
जिल्हा परिषदेत गुरुवारी जि.प. उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. त्यात विशेष घटक योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेसाठी लाभार्थी निवडताना नियमांचे काटेकोर पालन करा, पारदर्शक निवडी करा अश सूचना दौंड यांनी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य किशोर जगताप, विजय पोटे, महादेव बडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे यांच्यासह पशुधनविकास अधिकारी उपस्थित होते.
एका लाभार्थ्याला दोन गायी किंवा दोन म्हशी मिळणार आहेत. त्यासाठी ८५ हजार रूपयांचा निधी निर्धारित केला आहे. ७५ टक्के वाटा (६३ हजार रुपये) अनुदान स्वरुपात मिळणार असून लाभार्थ्याने २५ टक्के (२२ हजार रुपये) एवढ्या रकमेची स्वत: तरतूद करायची आहे. २५ टक्के वाट्याचा धनाकर्ष जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत आहे. त्यानंतर लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)
एकूण लाभार्थ्यांमध्ये ३० टक्के महिला तर ३ टक्के अपंग लाभार्थी असावेत. त्यासाठी तालुकानिहाय आलेल्या प्रस्तावांमधून जि.प. गटनिहाय यादी केली जाईल. त्यानंतर गटनिहाय निश्चित केलेल्या कोट्यासाठी एकत्रित केलेल्या चिठ्ठ्यांमधून स्वतंत्र सोडतीद्वारे लाभार्थी निवडले जातील. ही प्रक्रिया बसस्थानकासमोरील स्काऊट गाईड भवनात बुधवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकार, एकात्मिक आदिवसाी महामंडळ व रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रतिनिधी यांचा निवड समितीत समावेश आहे.