जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्य बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:26 IST2017-08-09T00:26:35+5:302017-08-09T00:26:35+5:30
जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्य बिनविरोध
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याची औपचारिक घोषणा निकालाच्या वेळी होणार असून, नगर परिषद गटासाठी ४ आणि नगर पंचायतीच्या एका जागेसाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत.
दर पाच वर्षांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक घेतली जाते. जिल्हा परिषद गटातून १९ आणि नगर परिषद ४ व नगर पंचायत गटातून एक सदस्यांची निवड होते. यंदा जिल्हा परिषद गटातून १९ जागांसाठी १९ अर्ज आले आहेत. त्यामुळे या जागांसाठी मतदान होणार नाही, हे स्पष्ट आहे. तर सामंजस्यातून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जागा वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यामध्ये शिवेसना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस १ आणि भाजपच्या ८ सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे निधी फारसा मिळत नव्हता. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. राजेश टोपे यांनी जिल्ह्याला नियोजन समितीसाठी राज्य शासनाकडून वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रलंबित विविध विकास प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे नियोजित विकास कामे करण्यासही निधीची अडचण येणार नसल्याचे दिसून येते.
२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी जवळपास २५१ कोटींंचा निधी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्याला मिळणार असल्याने मातब्बरांनी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद गटातून १९ सदस्यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर नगर परिषद गटातून २८ आणि नगर पंचायत गटातून ६ अर्ज आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १८ आॅगस्ट ही मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी २२ रोजी मतदान आणि २३ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.