१८९ जि.प. शाळांत सेमीचा संकल्प
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:49:16+5:302014-06-08T00:54:32+5:30
कंधार : नांदेड जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाने जवळपास ५ शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आवाहन केले होते.

१८९ जि.प. शाळांत सेमीचा संकल्प
कंधार : नांदेड जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाने जवळपास ५ शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आवाहन केले होते. कंधार शिक्षण विभागाने ते आव्हान स्वीकारले असून तब्बल सर्वच १८९ जि.प. शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचा संकल्प शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धाडसी पाऊल मानले जात आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
जि.प. शाळेत शासनस्तरावरुन विविध सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी जि.प. शाळेत शिकत असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. पायाभूत व भौतिक सुविधा, संगणक आदीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांशी कमालीची स्पर्धा करु लागला. अपवाद वगळता खाजगी शिक्षण संस्थेत सुविधांची वाणवा आहे. तरीही विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशची सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे जि. प. शाळा अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली. विद्यार्थीसंख्या कमी होण्याचा धोका निर्माण होईल. यातून नांदेड जि.प. शिक्षण समितीने अभिनव उपक्रम हाती घेतला.
२७ मे २०१४ रोजी जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाला किमान ४-५ शाळात शै. वर्षे २०१४-२०१५ पासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ६ जून रोजी कंधार तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यात सर्वच जि.प. शाळेत (१८९) पहिलीसाठी गणित इंग्रजी माध्यमातून आणि इयत्ता पाचवीसाठी गणित, विज्ञान इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचा धोरणात्मक संकल्प करण्यात आला आहे.
तालुक्यात जि.प. शाळांची संख्या १८९ एवढी आहे. त्यात प्राथमिक शाळा १८४ (३ उर्दूसह) व माध्यमिक शाळा ५ आहेत. १७ केंद्रांतर्गत असलेल्या शाळा असून कंधार केंद्रांतर्गत १५ शाळा, आंबुलगा १४, बहाद्दरपुरा-१३, बारुळ-१३, बोळका-११, चिखली-८, दिग्रस (बु)-१३, फुलवळ-११, गोणार-१०, पानभोसी-१२, रुई-१५, कौठा-१०, कुरुया-१२, मंगलसांगवी-८, शेकापूर-१३, शिराढोण-६ आणि उस्माननगर केंद्रांतर्गत ५ शाळा आहेत. बाचोटी, हासूळ शाळेने यापूर्वी आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता. आता नवीन संकल्प शिक्षणाला नवीन चालना देणारा ठरणार आहे. (वार्ताहर)
शिक्षण विभागाने केले होते आवाहन
२७ मे २०१४ रोजी जि.प. शिक्षण समितीने ता. स्तरावरील शिक्षण विभागाला किमान ४-५ शाळात शैक्षणिक वर्षे २०१४-२०१५ पासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ६ जून रोजी कंधार तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यात सर्वच जि.प. शाळेत (१८९) पहिलीसाठी गणित इंग्रजी माध्यमातून आणि इयत्ता पाचवीसाठी गणित, विज्ञान इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचा धोरणात्मक संकल्प करण्यात आला आहे.
शिक्षणक्षेत्रात काळानुरुप बदल होत आहेत. माहितीची नवीन दालने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक भर टाकत आहेत. मराठी व इंग्रजी विषयाची योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांना अधिक गुणवंत करण्याचा मानस आहे. सर्वांच्या सहकार्यातून ते शक्य आहे.- जी. आर. राठोड (गटशिक्षणाधिकारी, कंधार).