नगर जिल्ह्यात १८ हजार मोटारी
By Admin | Updated: April 15, 2016 01:52 IST2016-04-15T01:32:59+5:302016-04-15T01:52:15+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे.

नगर जिल्ह्यात १८ हजार मोटारी
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे.
जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रात औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कृषिपंपांद्वारे पाणी उपसा सुरू आहे. अगदी जलाशयाच्या क्षेत्रात एकेक किलोमीटर चर खोदून ही पाणी चोरी केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी जलसंपदा विभागाने पथके तैनात केलेली आहेत; परंतु त्याचा उपयोग न झाल्यामुळे मध्यंतरी जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीला कृषिपंपाची वायर काढून टाकण्याची विनंती केली होती, तरी शेतकऱ्यांनी पुन्हा या वायर जोडल्यामुळे आता जलसंपदा विभागाने उन्हाळ्याच्या काळात जलाशयाच्या भागातील विद्युत डीपीच काही काळासाठी काढायच्या आणि नंतर पावसाळ्यात त्या पुन्हा बसवायच्या, असा पर्याय शोधला आहे.
औरंगाबाद आणि अहमदनगर अशा दोन्ही भागांतील जलाशयाच्या क्षेत्रावरील डीपी काढून पुन्हा बसविण्याच्या उपायासाठी अनुक्रमे २१ आणि २५ लाख रुपयांचा खर्च येईल, असे कळविले आहे.
जायकवाडी धरणाचा काही भाग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात येतो. सध्याही या भागात सुमारे १८ हजार मोटारींनी अहोरात्र पाणी उपसा सुरू आहे. जलसंपदा विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात कारवाई करून आपल्याकडील भागातील बहुसंख्य मोटारी बंद केल्या आहेत; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील मोटारी मात्र सुरूच आहेत. म्हणून आता गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्या बाजूच्या मोटारींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.