CornaVirus : १७० वर्षाच्या परंपरेला पडला खंड; अजिंठा येथे श्रीराम नवमी साध्या पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:34 IST2020-04-02T17:33:08+5:302020-04-02T17:34:21+5:30
जगाला कोरोना मुक्त करण्याची भाविकांची प्राथना

CornaVirus : १७० वर्षाच्या परंपरेला पडला खंड; अजिंठा येथे श्रीराम नवमी साध्या पद्धतीने साजरी
- श्यामकुमार पुरे
अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा येथे १७० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे. येथे धुमधडाक्यात साजरी होणारी रामनवमी कोरोनामुळे यावर्षी अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावात काढली जाणारी भव्य मिरवणूक, गावागावातून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत, मंदिरात होणारे प्रवचन, कीर्तन, भजन, सामूहिक भंडारे, अन्नदान ही सर्व सार्वजनिक कार्यक्रम यावेळी रद्द करण्यात आले.काही चार ते पांच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा, आरती करून गुरुवारी रामनवमी साजरी करण्यात आली.
अजिंठा येथे सुमारे १८५१ मध्ये श्रीराम मंदिर बांधण्यात आले आहे.या ऐतिहासीक पुरातन मंदिरात दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येथे.पंचक्रोशीतील गावातून आलेल्या दिंडीसह गावातील भावीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते श्रीराम मंदिर परिसरात रंगोटी करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून मंदिरात मोठ्या भंडाऱ्याचे महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी केले जाते.पण यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पूजा अर्चा करून जगाला या महामारीतून लवकरच मुक्तता द्यावी अशी प्राथना रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्राला भाविकांनी केली.
जगाला कोरोना मुक्त करण्याची प्राथना
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीतून जगाची सुटका व्हावी यासाठी आम्ही आज रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्राला साकडे घातले आहे.प्रशासनाने लोकहितासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेचे काटोकाटपणे पालन व्हावे यासाठी आम्ही दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त पूजा अरचा आरतीने रामनवमी साजरी केली.
- भारत झलवार, अध्यक्ष, श्रीराम मंदिर संस्था, अजिंठा