वाळूज महानगर : रांजणगाव येथील किरायाच्या घरात राहणाऱ्या मुलाने आत्महत्या केली. ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे बुडाल्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या १७ वर्षीय किशोरवयीनाने हे पाऊल उचलले.
मृत किशोरवयीनाने (रा. जायकोवाडी, ता. माजलगाव, जि. बीड, ह.मु. रांजणगाव) २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. लक्ष्मण सोसे यांच्या राहत्या घरातील हॉलमध्ये त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरच्यांना प्रकार लक्षात येताच श्रेयस व ऋषिकेश सोसे यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच रात्री ११.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत बेगमपुरा पोलिस ठाण्यात एमएलसी अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तो ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेला होता व त्यात आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.