जिल्ह्यात १७ हजार मेट्रिक टन खत शिल्लक
By Admin | Updated: September 24, 2014 00:16 IST2014-09-24T00:07:51+5:302014-09-24T00:16:35+5:30
नांदेड- जिल्ह्यात रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरु झाली असून २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

जिल्ह्यात १७ हजार मेट्रिक टन खत शिल्लक
नांदेड- जिल्ह्यात रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरु झाली असून २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात कृषी विभागाकडून नियोजन सुरु असून आजघडीला विविध दुकानदाराकडे जवळपास १७ हजार ३०० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत आणखी खत उपलब्ध होणार असल्याने खताची कमतरता भासणार नसल्याचे दिसते.
यावर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतर पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने खरिपाच्या शंभर टक्के पेरण्याही होऊ शकल्या नाहीत, परंतु यानंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या रबीकडून अपेक्षा वाढल्या. यावर्षी रबी हंगामासाठी २ लाख १२ हजार १० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यात रबी ज्वार ३३ हजार हेक्टर, गहू ३७ हजार हेक्टर, हरभरा १ लाख १५ हजार हेक्टर, मका २६०० हेक्टर, करडई ४६०० हेक्टर, सूर्यफुल ९०० हेक्टर, भुईमूग १९ हजार हेक्टर व इतर अशी एकूण २ लाख १२ हजार १०० हेक्टरवर पेरणी होईल. गतवर्षी झालेली पीकनिहाय पेरणी अशी- रबी ज्वार ३०९८४ हेक्टर, गहू ३१९३२ हे., हरभरा ८२३०१ हे., मका १०६२ हे.करडई ४३३२ हे., सूर्यफुल १४३० हे., तर भुईमुगाची ८३९७ हेक्टरवर पेरणी झाली होती.
जिल्ह्याला या हंगामासाठी २ लाख १९ हजार ६९६ मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. यात युरिया ८० हजार मेट्रिक टन, एसएसपी २० हजार मे.टन, डीएपी ३० हजार मेट्रिक टन, एमयुपी २० हजार मे.टन, संयुक्त खते ६४६९६ मे टन व इतर अशी एकूण २ लाख १९ हजार ६९६ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. सन २०१२-१३ च्या रबी हंगामात १ लाख ७५ हजार हे. तर २०१३-१४ च्या हंगामात १ लाख ६० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर या हंगामात रबीसाठी २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.
रबीच्या पेरणीसाठी महाबीजकडून १९ हजार २८ क्विंटल तर खाजगी कंपन्याकडून ५४ हजार ९० क्विंटल बियाणाची मागणी केलेली आहे. यात रबी ज्वार २३७६ क्विंटल, गहू २९६०० क्विंटल, हरभरा ३१०५० क्विंटल, मका २०३ क्विंटल, करडई ३०८ क्विंटल, सूर्यफूल ८१ क्विंटल, भुईमूग ९५०० क्विंटल याप्रमाणे ७३ हजार ११८ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे़ (प्रतिनिधी)