१५०४ गावांमधील कामे अद्याप अपूर्ण
By Admin | Updated: April 28, 2016 23:50 IST2016-04-28T23:27:38+5:302016-04-28T23:50:11+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़

१५०४ गावांमधील कामे अद्याप अपूर्ण
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़ तर केवळ १७८ गावांमधील कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी जूनअखेरपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे़ या मुदतीत हे काम पूर्ण करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़ अभियानासाठी २०१५-१६ या वर्षासाठी मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड केली़ या गावांमध्ये जलसंधारणाची जवळपास ७२ हजार १५९ कामे करण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत केवळ १७८ गावांमधील कामे या अभियानांतर्गत पूर्ण झाली आहेत. २०३ गावांमध्ये ८० टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे़ तर ४३१ गावांमध्ये ५० टक्के , ३८९ गावांमध्ये ३० टक्के , तर ४८१ गावांमध्ये ३० टक्क्यांहूनही कमी कामे या अभियानांतर्गत झालेली आहेत़ आता महिनाभराच्या काळात प्रशासनाकडून १५०४ गावांमधील सुरू असलेली योजनेची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न आहे़
दुसऱ्या टप्प्यात १५०० गावे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मराठवाड्यातील १५०० गावांची निवड करण्यात आली आहे़ जवळपास सर्वच गावांना प्रशासकीय यंत्रणेद्वारा शिवार भेटी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे़ एप्रिलअखेरपर्यंत सर्व गावनिहाय आराखडे तयार होतील़ यावर्षीच्या गावासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.