क्रांतीचौक परिसरातील १,५०० घरांची ‘वीज गुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST2021-04-06T04:04:27+5:302021-04-06T04:04:27+5:30
औरंगाबाद : रमानगर भागातून जात असलेली महावितरणची ११ केव्हीची भूमिगत केबल काम सुरू सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ...

क्रांतीचौक परिसरातील १,५०० घरांची ‘वीज गुल’
औरंगाबाद : रमानगर भागातून जात असलेली महावितरणची ११ केव्हीची भूमिगत केबल काम सुरू सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जेसीबी मशीनमुळे तुटली. त्यामुळे दिवसभर क्रांतिचौक परिसरातील जवळपास १,५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. परिणामी, परिसरातील अनेक घरे रात्री अंधारात बुडाली. उकाड्याने नागरिक हैराण झाले.
भूमिगत केबलची दुरूस्ती केल्यानंतर रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. रमानगर परिसरातून ‘महावितरण’ची ११ केव्ही क्षमतेची भूमिगत केबल गेलेली आहे. ही भूमिगत केबल खोदकामात जेसीबी मशीनमुळे तुटली. त्यामुळे क्रांती चौक, शासकीय दूध डेअरी या परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. दुपारी अडीच वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्यामुळे उकाड्याने या भागातील नागरिक हैराण झाले होते. तब्बल ५ ते ६ तास या परिसरातील वीज गुल असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेतले. रात्री ९.३० वाजेपर्यंत बहुतांश जणांचा वीजपुरवठा सुरळीत झाला, केवळ रमानगर परिसरातील काही ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे रात्री दहा वाजता ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.