दिवे न लावताच १५ कोटींची बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 00:06 IST2017-07-04T00:05:35+5:302017-07-04T00:06:33+5:30
औरंगाबाद : शहरातील ५० हजारांहून अधिक पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.

दिवे न लावताच १५ कोटींची बिले
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ५० हजारांहून अधिक पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांनी मागील दीड वर्षात कोणतेच काम न करता तब्बल १५ कोटी रुपयांची बिले उचलली असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कंत्राटदार काम करीत नाहीत हे महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सर्वश्रुत असतानाही ‘डोळे’बंद करून दर महिन्याला ८० लाख रुपयांची बिले देण्यात येत आहेत.
शहरातील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती महापालिकेकडून करणे अशक्य वाटू लागल्याने काही वर्षांपूर्वी आऊटसोर्सिंग करण्यात आले. पथदिवे सायंकाळी सुरू करणे, सकाळी बंद करणे, बंद पडलेले दिवे सुरू करणे, त्यासाठी लागणारे साहित्य स्वत: कंत्राटदाराने खरेदी करून आणणे आदी कामांसाठी महापालिकेने प्रारंभी नऊ कंत्राटदार नेमले. महापालिकेच्या दिव्याखाली बराच ‘अंधार’असल्याचे लक्षात येताच अनेक राजकीय मंडळींनी आपल्या एजन्सी सुरू केल्या. हळूहळू पथदिव्यांच्या कंत्राटदारांची संख्या २२ पर्यंत पोहोचली.
दीड वर्षापूर्वी या सर्व कंत्राटदारांचे काम संपले. त्यानंतर निविदा काढून पुन्हा याच कंत्राटदारांना तुकडे पाडून काम देण्यात आले. आता परत त्यांचा कार्यकाळ संपत आला असताना डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सातारा-देवळाईसह शहरातील पथदिव्यांची संख्या आता ५० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यातील २० ते २२ हजार पथदिवे आजही बंद आहेत. ६० टक्के पथदिव्यांवरच सध्या काम सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून कंत्राटदारांनी काम करणेच बंद केले आहे. दर महिन्याला बोगस बिल सादर करून पैसे लाटण्याचा सपाटा या कंत्राटदारांनी सुरू केला आहे.
दर महिन्याला २२ कंत्राटदारांचे ८० लाख रुपयांचे बिल तयार करण्यात येते. विद्युत विभागाचे अधिकारीही कोणतीही शहानिशा न करता ही बिले लेखा विभागात पाठवून देतात. ज्येष्ठता यादीनुसार कंत्राटदारांना थोडे थोडे पैसे मिळत असतात. पैसे मिळत नसल्याची ओरड हे कंत्राटदार कधीच करीत नाहीत, हे विशेष.