विभागात ५ जून रोजी वृक्ष लागवड मोहीम
औरंगाबाद : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनला मराठवाड्यात विभागातील सर्व गावांत व शहरात मोहीम स्वरूपात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
वृक्षलागवडीच्या या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच लोकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. विभागातील प्रत्येक गावातील व शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे किमान ३ झाडे लावण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक आणि सर्व विभाग प्रमुखांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी आदेश दिले. गावातील, शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळया जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा, कॅनॉलच्या दुतर्फा, नदी, नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
समिती गठीत करण्याचे आवाहन
औरंगाबाद : स्थानिक प्राधिकरणे, शासकीय कंपनी, सहकारी संस्था, खासगी संस्था, सोसायटी, शैक्षणिक संस्था, मॉल, खासगी कंपनी व इतर कार्यालयात १० किंवा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्या प्रत्येक ठिकाणी महिला संरक्षण अधिनियम २०१३ अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करावी. समितीचा फलक कार्यालयाच्या, कंपनीच्या दर्शनी भागात लावावा, असे उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी कळविले आहे.
खरीप हंगाम; मोहिमांना सुरुवात
औरंगाबाद : खरीप हंगामानिमित्त शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी कृषी विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे. यात माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन, बी. बी.एफ. तंत्रज्ञान वापर, विनाअनुदानित तत्त्वावर बीजप्रक्रिया, शेती शाळेद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसाराचा समावेश असणार आहे. सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांचा वापर, प्रत्येक गावाच्या मातीचे नमुने तपासून त्या गावातील मातीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.