औरंगाबाद जिल्ह्यात आढळले १४७ ‘मुन्नाभाई’
By Admin | Updated: December 23, 2014 00:24 IST2014-12-23T00:24:39+5:302014-12-23T00:24:39+5:30
औरंगाबाद : आजही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात शासन आणि नोंदणीकृत खाजगी डॉक्टर कमी पडले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आढळले १४७ ‘मुन्नाभाई’
औरंगाबाद : आजही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात शासन आणि नोंदणीकृत खाजगी डॉक्टर कमी पडले आहेत. परिणामी कोणत्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसलेले सुमारे १४७ ‘मुन्नाभाई’ औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही मंडळी खेड्यापाड्यांसह औरंगाबादेतही स्वत:चे दवाखाने उघडून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात वैद्यकीय, होमिओपॅथी आणि आयुर्वेद, युनानी यापैकी कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांशिवाय अन्य सर्व प्रकारच्या डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून ओळखले जाते. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना आपल्या क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात १४७ बोगस डॉक्टर बिनधास्तपणे दवाखाने उघडून रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. या बोगस डॉक्टरांची माहिती नुकतीच आरोग्य विभागाने जमा केली आहे. महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेल्या डॉक्टरांनाच वैद्यकीय व्यवसायाची परवानगी दिलेली आहे.
एका महिन्यात कारवाईचे आदेश
बोगस डॉक्टरांविषयी अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाने चार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केल्याचे सांगितले. मात्र, उर्वरित सर्व बोगस डॉक्टरांचे दवाखाने कायमस्वरूपी बंद करावेत आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई एक महिन्यात करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीची बैठक दर तीन महिन्यांतून एकदा होत असते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५४ बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. पैठण तालुक्यात ३१, कन्नड २४, औरंगाबाद ९, खुलताबाद १६ आणि फुलंब्री तालुक्यात १० तर सोयगावमध्ये एक बोगस डॉक्टर असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. त्यापैकी केवळ चार डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली.
बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशातून आणल्या पदव्या
४यापैकी बहुतेक जणांच्या पदव्या एसएससी, बीईएमएस, आरएमपी, डीएनएमएस, पीएमपी, बीईएमएस-एन.डी, बीईएमएस-ईएचआर, डीएनएमएस, आययू,डीसीए, सीसीवायएन, बीआयएएनएस, डीईएफएम अशा आहेत. विशेष म्हणजे या पदव्यांचे फुलफॉर्मही या डॉक्टरांना सांगता येत नाहीत. या पदव्या त्यांनी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांतून मिळविल्याचे समोर आले आहे.