१४६२ रोहित्रे उभारणार - दानवे
By Admin | Updated: July 2, 2014 00:26 IST2014-07-01T23:21:53+5:302014-07-02T00:26:34+5:30
जालना : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना नवीन विद्युत कनेक्शन मिळावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.

१४६२ रोहित्रे उभारणार - दानवे
जालना : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना नवीन विद्युत कनेक्शन मिळावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात विभाग क्रमांक १ मध्ये ८१५ व विभाग क्रमांक २ मध्ये ६४७ अशा एकूण १४६२ विद्युत रोहित्र उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
त्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१२ पर्यंत कोटेशन भरले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या एजन्सीने ही कामे करण्याची निविदा घेतली आहे. त्या एजन्सीला वेळेत काम करण्याच्या सूचना दिल्या. रोहित्र उभारणीच्या निविदा मागविण्यात आल्या असून आगामी नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन इन्फ्रा दोन अंतर्गत मंजूर झालेली सर्व प्रलंबित विद्युत रोहित्र उभारणीची कामे सुरू होणार आहेत. इन्फ्रा २ अंतर्गत जिल्ह्यात नवीन ३३ केव्हीची नऊ उपकेंद्रे ही भाटेपुरी, सिपोरा अंभोरा, सिपोरा बाजार, वाकुळणी, बाणेगाव, चंदनापुरी, बोररांजणी, बुटेगाव येथे मंजूर करण्यात आलेली आहे. तेथील कामे नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहेत.
यावेळी कार्यकारी अभियंता तालेवार, सहाय्यक अभियंता बाबर, निधोनकर यांच्यासह ााजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, रामेश्वर भांदरगे, सतीश जाधव, बन्सीधर आटोळे आदी उपस्थित होते.