१४५ कोटींचे पीक कर्ज वाटप होईना !
By Admin | Updated: September 17, 2014 01:12 IST2014-09-17T00:45:23+5:302014-09-17T01:12:56+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

१४५ कोटींचे पीक कर्ज वाटप होईना !
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे वाटप करणे बाकी असल्याचे लोकमतने उघडकीस केल्या नंतर पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरुध्द आता कडक कारवाईचे पाऊल प्रशासनाने उचले असून बँका शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन देत नसल्याने प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बँकाना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ऐन पेरणीच्या काळात पावसाने ओढ दिली. तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता पेरणी उरकली. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या भरवश्यावर उसणवारी करून गरज भागविली. परंतु, अर्ज दाखल करूनही कर्ज मिळत नाही, अशी ओरड मागील काही दिवसांपासून होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. बळीराजा या गैरसोयीला तोंड देत असतानाच काही राष्ट्रीयकृत बँकांनी खाजगी नियमापेक्षा जास्त व्याज आकारल्याचेही समोर आले होते. या दुहेरी संकटामुळे बळीराजा अक्षरश: हवालदिल झाला आहे.
खरीप हंग़ामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी अनेक बँकाची निराशाजनक आहे. वारंवार पाठपुरावा करुनही बँका दखल घेत नसल्याने लागोपाठच्या दोन वर्षाची दुष्काळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्याचञया दृष्टीने ही आपत्तीची परिस्थिती आहे. या परिस्थितीत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.
ऐनवेळी पैसा उभा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठेही झिजवावे लागले. वास्तविक पैशाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकांकडून यापैकी केवळ ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असून जवळपास १४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज अद्यापही वाटप झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा बँकांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.