१४२ मजुरांचा पत्ताच नाही !

By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:51:33+5:302014-06-25T01:05:39+5:30

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही.

142 laborers do not know! | १४२ मजुरांचा पत्ताच नाही !

१४२ मजुरांचा पत्ताच नाही !

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही. तर जॉबकार्ड धारक असलेले १४३४ जणांना इतरत्र रोजगार उपलब्ध असल्याने त्यांनी कामाची आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले़ त्यामुळे सदर बोगस मजुरांची नावे कोणी घुसविली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिकसळ (ताक़ळंब) येथील महाग्रारोहयो अंतर्गत नोंदणीकृत मजुरांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे़ यात नोंदणीकृत मजुरांची संख्या ३३३१ असली तरी प्रत्यक्षात ११३३ मजुरांनी कामाची मागणी केल्याचे समोर आले असून, इतरत्र व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १८९७ असल्याचे समोर आले आहे. या एकूणच प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे़
जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी १८ जून रोजी डिकसळ येथील हनुमान मंदीर ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था या महाग्रारोहयो अंतर्गतच्या रस्ता कामास भेट दिली होती़ त्यावेळी गावात नोंदणीकृत मजुरांची संख्या हजारावर असताना प्रत्यक्ष कामावर कमी उपस्थित असल्याचे जाणवले़ डिकसळ गावातीलच मजुरांना कामाची आवश्यकता आहे का ? स्थलांतर झाले आहे का ? इतरत्र कोठे काम करतात का ? आदी मुद्द्यावर प्रत्यक्ष मजुरांचा जबाब घेऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनास दिल्या होत्या़ प्रशासनाने थेट भेटी देऊन सर्वेक्षण केल्याने खळबळ उडाली आहे. अहवालानंतर समोर येणारी वस्तुस्थिती पाहता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़
१३ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण
तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले़ पंचायत समिती, तहसील मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तीन तलाठी, एक ग्रामसेवक, एक रोजगार सेवक, पंचायत समितीच्या सात तांत्रिक अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. गुरूवारी दुपारपासूनच या पथकाने आपले काम सुरू केले़ एका कर्मचाऱ्याकडे जवळपास २५० ते ३०० लोकांची यादी देण्यात आली होती़ या पथकाने दोन दिवसात डोअर-टू-डोअर फिरून प्रत्यक्ष सर्वेक्षण केले़ नावानुसार घरे व व्यक्ती शोधताना या पथकाची चांगलीच दमछाक झाली़ त्यामुळे आता जिल्हाधिकारी या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
कठोर कारवाईची आवश्यकता
दुष्काळी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे घेण्यात येतात. मात्र याचा लाभ गरजुंना मिळण्याऐवजी अधिकारी, गुत्तेदारांची लॉबी घेत असल्याचे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यावरुन स्पष्ट होत आहे. कळंबसह परंडा, वाशी तालुक्यातील रोहयो कामातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आता सर्वसामान्यातून होत आहे.
११३३ जणांना कामाची गरज
सर्वेक्षणानंतर डिकसळ येथील ११३३ जॉबकार्ड धारकांना रोजगाराची गरज असल्याचे सांगण्यात आले़ गावातील १४३४ जणांनी खासगी किंवा स्वयंरोजगार करणार असल्याचे व यातील इतरत्र नोकरी करत असतानाही मजुराच्या नोंदणी यादीत असल्याचे सूत्रांनी सांगितले़
असे आहे गावचे चित्र

सर्वेक्षणातील मजूर संख्या : ३३३१
रहिवासी असलेले : २२६५
स्थलांतरित झालेले : ०५६०
गावाला ज्ञात नसलेले : १४२
मयत झालेले : ६२
इतर व्यवसायात असलेले : १४३४
मजुरीची आवश्यकता असलेले : ११३३

Web Title: 142 laborers do not know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.