एकाच फिडरवर १४ गावे
By Admin | Updated: May 28, 2014 00:27 IST2014-05-28T00:10:14+5:302014-05-28T00:27:01+5:30
कळंब : तालुक्यातील ईटकूर येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रातून जाणार्या ईटकूर फिडरवर कळंब तालुक्यातील आठ व वाशी तालुक्यातील सहा गावाचा समावेश आहे.

एकाच फिडरवर १४ गावे
कळंब : तालुक्यातील ईटकूर येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रातून जाणार्या ईटकूर फिडरवर कळंब तालुक्यातील आठ व वाशी तालुक्यातील सहा गावाचा समावेश आहे. फिडरची लांबी वाढल्याने व गावाची संख्या जास्त असल्याने ट्रिपींगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्राहकांना त्रास होत असल्याने या फिडरवरील भार कमी करावा, अशी मागणी होत आहे. कळंब तालुक्यातील ईटकूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र व कनिष्ठ अभियंता कार्यालय आहे. या उपकेंद्राच्या अंतर्गत २४ गावाचा समावेश असून, गावात उपकेंद्र असतानाही भारनियमन कालावधी वगळता इतर कालावधीत अखंडित वीज पुरवठा मिळत नाही. विजेची ये-जा सतत चालू असते याला ग्राहक वैतागून गेले आहेत. ईटकूर उपकेंद्रात स्वतंत्र असे ईटकूर फिडर कार्यरत आहे. या फिडरवर कळंब तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, गंभीरवाडी, बोरगाव (ध), कोठाळवाडी, वाकडी, आथर्डी, पाथर्डी ही आठ गावे तर वाशी तालुक्यातील झिन्नर, पिंपळगाव (लिंगी), घोडकी, मांडवा, सारोळा (मा) ही सहा गावे असे एकूण १४ गावे आहेत. शिवाय फिडरची लांबी इतर फिडरच्या तुलनेत जास्त आहे. एवढी मोठी गावे व जास्त लांबी असलेले हे तालुक्यातील एकमेव फिडर आहे. वीज पुरवठ्यात येतोय व्यत्यय या फिडरवर गावांची संख्या जास्त असल्याने कोठेही थोडासाही फॉल्ट झाला तरी लाईट ट्रीप होते. काहीवेळा बराच काळ वीज गुल असते. पावसाचे थोडे थेंब पडले तरी किंवा हलकी हवा सुटली तरी वीज पुरवठा खंडित होतो. याचा घरगुती विद्युत उपकरणावरही विपरित परिणाम होत असून, ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही. फिडर स्वतंत्र करावेत ईटकूर गावामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वापर करणार्या ग्राहकांची संख्या हजाराच्या घरात आहे. एवढा लोड असल्याने ईटकूर गावासाठी स्वतंत्र फिडरद्वारे वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार अंदाजपत्रकास मान्यताही मिळाली आहे. परंतु प्रत्यक्षात काम करण्यास मुहूर्त सापडलेला नाही. याशिवाय तालुक्यातील इतर सात गावांना स्वतंत्र फिडर निर्माण करणे गरजेचे आहे. वाशी तालुक्यातील गावे तोडावीत कळंब तालुक्यात वाशी तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वी असलेली काही गावे वाशी तालुक्याची निर्मिती झाली तरी ईटकूर येथील उपकेंद्रालाच जोडलेली आहेत. झिन्नर, घोडकी, पिंपळगाव (लिंगी), सोनेगाव, मांडवा, सारोळा या वाशी तालुक्यातील गावांना ईटकूर येथूनच पुरवठा होत आहे. यामुळे या फिडरवरील लोड वाढत आहे. त्यामुळे वाशी तालुक्यातीलही गावे ईटकूरपासून तोडणे आवश्यक आहे. पाऊस व वार्यामुळे ट्रिपींग होत असून, आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जात आहेत. ईटकूरसाठी लवकरच स्वतंत्र फिडरद्वारे विद्युत पुरवठा केला जाणार आहे. तसेच वाशी तालुक्यातील गावे स्वतंत्र करण्यासाठी त्या विभागामार्फत लाईन टाकण्याचे काम चालू आहे.