१२४ औषधी दुकानांचे परवाने रद्द
By Admin | Updated: July 31, 2014 00:41 IST2014-07-30T23:47:38+5:302014-07-31T00:41:44+5:30
परभणी: जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या १२४ औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले असून २५ परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
१२४ औषधी दुकानांचे परवाने रद्द
परभणी: जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या १२४ औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले असून २५ परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील असल्याची माहिती औषध निरीक्षकांनी दिली.
औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा व औषध किंमत नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने १ वर्षामध्ये जिल्ह्यातील ८५० औषधी विक्री दुकानांपैकी ६०१ दुकानांची तपासणी केली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या १७१ दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सहाय्यक आयुक्त व्ही.टी.पौनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी ही कारवाई केली आहे.
रजिस्ट्रर्ड फार्मासिस्टचे प्रमाणपत्र औषधी विक्री दुकानांना भाड्याणे देऊन इतरत्र नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या फार्मासिस्टच्या बाबतीत या कार्यालयाकडून कडक कारवाया केल्या जात आहेत. औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी अशा व्यक्तीविरुद्ध वर्षभरात पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत व विना विक्री बिलाने वर्गीकृत औषधींची विक्री करणे, औषध विक्री बिलांचा तपशील न ठेवणे, नशेली व गर्भपात संदर्भातील औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व विना विक्री बिलाने विकणे, विना परवाना होमियोपॅथिक औषधींची विक्री करणे आदी बाबत प्रशासनाकडून कारवाया केल्या जात आहेत. तेव्हा औषध विक्रेत्यांनी योग्य त्या नियमांचे पालन करणे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)