११६ तंटामुक्त गावांना प्रशस्तीपत्रकाची प्रतीक्षा !
By Admin | Updated: March 26, 2015 00:56 IST2015-03-26T00:49:11+5:302015-03-26T00:56:54+5:30
लातूर : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी, या दृष्टिकोनातून २००५ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली

११६ तंटामुक्त गावांना प्रशस्तीपत्रकाची प्रतीक्षा !
लातूर : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी, या दृष्टिकोनातून २००५ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात तंटामुक्त मोहिमेला गती आली. लातूर जिल्ह्यातील ७८७ गावांतील तंटामुक्त समित्यांच्या कामामुळे सर्व गावे तंटामुक्त झाली. त्यांना पारितोषिकही मिळाले. परंतु, २००९-१० ते २०१०-११ या कालावधीत तंटामुक्त झालेल्या ११६ गावांना पारितोषिकाची रक्कम मिळाली. परंतु, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीने मिळणारे प्रशस्तीपत्रक मात्र अद्यापही मिळाले नसल्याने या गावातील तंटामुक्त समित्यांना प्रशस्तीपत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात ७८७ गावांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत समित्यांची स्थापना करण्यात आली. या मोहिमेला गती मिळावी या दृष्टिकोनातून प्रबोधनासाठी खंडू पवार लिखित ‘बिन भानगडीचं गाव’ हे नाटकही गावोगाव दाखवून तंटामुक्तीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ६७१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना पुरस्काराच्या रकमेसह प्रशस्तीपत्रकही मिळाले. परंतु, त्यानंतर २००९-१० मध्ये १०५ गावे तंटामुक्त झाली. त्यांना ३ कोटी ७२ लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले. तसेच २०१०-११ मध्ये ११ गावे तंटामुक्त झाली. या गावांना ५२ लाखांची पारितोषिके मिळाली.
परंतु, या पारितोषिकांबरोबर शाबासकीची थाप म्हणून गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक त्या-त्या तंटामुक्त समितीला देणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही ते प्रशस्तीपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे त्या गावांनी गाव तंटामुक्त केले. याचा सबळ पुरावा त्यांच्याकडे मात्र अद्यापही मिळालेला नाही. (प्रतिनिधी)