११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन
By Admin | Updated: August 20, 2014 01:51 IST2014-08-20T01:29:48+5:302014-08-20T01:51:40+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून

११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११४ गावांनी दोन महिन्यात आपले गाव १०० टक्के पाणंदमुक्त करावे, अन्यथा संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी दिला.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी निर्मल भारत अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांसाठी आयोजित उद्बोधन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. शितलकुमार मुकणे, हनुमंत गादगे, शोभा टेकाळे, भिसे, गिरी, भाले, तोपरसे यांच्यासह जिल्ह्यातील गट समन्वयक व समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रावत म्हणाल्या की, बेस लाईन डाटा एंट्रीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यामध्ये ३३ व्या क्रमांकावर होता. परंतु, या आठवड्यात राज्यात ५ व्या क्रमांकावर आल्याने त्यांनी ग्रामसेवक व निर्मल भारतच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ३१ आॅगस्टपर्यंत संबंधित ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने १०० टक्के गाव हगणदारीमुक्त बनविण्याचा मुदत आराखडा तयार करावयाचा आहे. व दोन महिन्यात गाव हगणदारीमुक्त बनवून निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्तावित करावयाचे आहे. अन्यथा सरपंचावर अपात्रतेचा ठराव व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी रावत यांनी दिला. निर्मल भारत अभियानात संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याचाही निर्धार यावेळी बोलून दाखविला. तसेच पंतप्रधान यांनी स्वातंत्र्यदिनी हगणदारी मुक्त भारत बनविण्याचा संकल्प बोलून दाखविल्याचे यावेळी संबंधितांना सांगितले. तसेच शौचालय बनविण्याची गती वाढविण्याच्याही सूचना सरपंच, ग्रामसेवक व भारती निर्माण अभियानच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.