१०० ब्रास वाळू केली जप्त
By Admin | Updated: March 19, 2017 23:35 IST2017-03-19T23:30:59+5:302017-03-19T23:35:03+5:30
लोहारा : येथील महसूलच्या पथकाने तावशीगड येथे दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल १०० ब्रास वाळू जप्त केली़

१०० ब्रास वाळू केली जप्त
लोहारा : येथील महसूलच्या पथकाने तावशीगड येथे दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल १०० ब्रास वाळू जप्त केली़ तसेच एक ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली़ तर दोनच दिवसांपूर्वी तहसीलच्या पथकाने एक हायवा व एका ट्रॅक्टरविरूध्द कारवाई केली होती़
लोहारा येथील महसूल प्रशासनाकडून अवैध वाळूवाहतूक करणाऱ्यांविरूध्द जोरदार कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे़ महसूलच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा व एका ट्रॅक्टर विरूध्द कारवाई केली होती़ त्यावेळी १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वाळू माफियांकडून चोरट्या पध्दतीने वाळू वाहतूक केली होती़ याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाल्यानंतर रविवारी तालुक्यातील तावशीगड येथे अवैध वाळू वाहतूक करण्यात करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात आली़
तहसीलदार डॉ. रोहन काळे, मंडळ अधिकारी ए. आर. याजव, बी. एस. जगताप, तलाठी जगदीश लांडगे आदींनी दुपारी तावशीगड येथे जावून एका ठिकाणी ४० ब्रास वाळू व दुसऱ्या ठिकाणी ६० ब्रास वाळू अशी एकूण शंभर ब्रास वाळू व एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. महसूल पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत़