१० कोटी वाटपाचा तिढा अखेर सुटला !
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:16:55+5:302014-06-26T00:38:25+5:30
उस्मानाबाद : विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत (एसआरएफ) जिल्ह्यासाठी १० कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला होता.

१० कोटी वाटपाचा तिढा अखेर सुटला !
उस्मानाबाद : विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत (एसआरएफ) जिल्ह्यासाठी १० कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला होता. मात्र कुठल्या सदस्यांची किती कामे घ्यायची यावरुन कुरघोडी सुरु झाली होती. सदस्यांच्या या गोंधळामध्ये मागील तीन महिन्यांपासून निधी पडून आहे. या संदर्भात १४ जून रोजी ‘लोकमत’ ने ‘१० कोटीवरुन हेवे-दावे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यात आला. ५४ सदस्यांना प्रत्येकी एक तर बांधकाम विषय समिती सदस्यांना प्रत्येकी तीन कामे देण्याचे ठरले. तसेच पालकमंत्री, सभापती यांनी सुचविलेली कामेही यातून घेतली जाणार आहेत.
जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. मात्र त्या तुलनेत निधी कमी मिळत आहे. २०१३-१४ साठी ८ कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे. त्याच्या दीडपट म्हणजेच जवळपास साडेदहा कोटीची कामे या माध्यमातून घेतली जाणार आहेत. हा निधी मंजूर होवून काही महिन्याचा कालावधी लोटला होता. मात्र सदस्यातील रुसवे-फुगवे आणि हेवे-दावे यामुळे मागील अडीच ते तीन महिन्यांपासून एकाही कामाला मंजुरी मिळू शकली नव्हती. पावसाळा सुरु झाला तरीही विषय समितीकडून कुठलाच निर्णय झाला नव्हता. अखेर १४ जून रोजी ‘लोकमत’ने ‘१० कोटीवरुन हेवे-दावे’ या मथळ्याखाली हे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतच पदाधिकाऱ्यांचीही धावपळ सुरु झाली. मागील तीन-चार दिवसामध्ये निधी वितरणाचे नियोजन करुन बुधवारी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा विषय घेण्यात आला.
यावेळी सर्व सदस्यांना म्हणजेच ५४ जणांनी सुचविलेले प्रत्येकी एक काम घेण्याचे निश्चित झाले. तसेच विषय समितीवरील सदस्यांची जास्तीची दोन कामे घेतली जाणार आहेत. त्यामुळे आता या सदस्यांच्या प्रत्येकी तीन कामांचा समावेश होईल. तसेच पंचायत समिती सभापतींचीही एकेक कामे घेतली जाणार आहेत. बांधकाम समिती सभापती आणि पालकमंत्र्यांनी प्रत्येकी पाच कामे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच कपात सूचना, रास्तारोको आदींसाठी तीन ते पाच कामे ठेवली जावू शकतात. एकंदरीत आज झालेल्या विषय समितीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी कसल्याही स्वरुपाचे आढेवेढे न घेता निधी वाटपाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रस्तावांची संख्या ३१८ वर जाऊन ठेपली आहे. त्यासाठी किमान ६६ कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे. मात्र चालू वर्षासाठी केवळ ८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या माध्यमातून जास्त खराब झालेले रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यानुसारच नियोजन केले असून, निधीचे वाटप समान पद्धतीने केले आहे.
- धनंजय सावंत
बांधकाम सभापती, जि.प. उस्मानाबाद