अवकाळी पावसाचा महावितरणाला एक कोटी ७० लाखांचा फटका
By साहेबराव हिवराळे | Updated: April 25, 2024 19:49 IST2024-04-25T19:49:12+5:302024-04-25T19:49:39+5:30
शहर व सातारा परिसरात अजूनही काही खांब आडवे आहेत. परिसरात वीजपुरवठा करीत आहेत. मात्र धोकादायक स्थितीत आहेत.

अवकाळी पावसाचा महावितरणाला एक कोटी ७० लाखांचा फटका
छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने व वाऱ्याच्या दाबामुळे एक कोटी ७० लाखांचा फटका महावितरणला बसला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी अद्याप बहुतांश ठिकाणी वाकडे झालेले खांब बदलणे बाकी आहे.
महावितरणचे कर्मचारी आणि आऊटसोर्सिंगचे १०० कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले होते. हवेचा जोर जास्त असल्यामुळे अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत पूर्ण शहर अंधारात बुडाले होते. एक नंबर झोनमध्ये सर्वाधिक नुकसान १ कोटी ३० लाख तर दोन नंबर झोनमध्ये ४० लाखांचा आतापर्यंतचा फटका महावितरणला बसला आहे. अजून पूर्ण खर्चाची मर्यादा प्लॅनिंग टीमला काढावी लागणार आहे.
यात वायर ट्रान्सफॉर्मर, पोल, कर्मचारी असा समावेश असून, हा अंतिम आकडा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण व त्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अखंड दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत वीज सुरळीत केली. परंतु, अजूनही काही परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. धोकादायक खांब काढून नवीन खांब त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.