जि.प. सदस्याविरुध्द अॅट्रासिटी दाखल
By Admin | Updated: November 2, 2014 22:31 IST2014-11-02T22:31:52+5:302014-11-02T22:31:52+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे.

जि.प. सदस्याविरुध्द अॅट्रासिटी दाखल
कोरपना : राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे.
गडचांदूर येथील अमलनाला जलाशयालगत मानोली (खु.) हे आदिवासीबहुल खेडेगाव आहे. येथील आदिवासी बांधव हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार असल्याचे नेहमी विविध निवडणुकांत दिसून येते. यावेळी मात्र विपरीत घडले. अलीकडेच पार पडलेल्या राजुरा विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर या खेडेगावातून काँग्रेस पक्षाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे या गावात वास्तव्य करणारे आणि काँग्रेसचे जि.प. सदस्य नानाजी गोविंदा आदे हे आदिवासी बांधवांवर संतप्त झाले. गावातील सार्वजनिक चौकात बसून असलेल्या माणकू भिकाजी कुळमेथे या आदिवासी बांधवास कथितरीत्या जातीवाचक शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने गावातील आदिवासी बांधव एकत्र येऊन त्यांनी त्याच दिवशी अर्थात १६ आॅक्टोबरला गडचांदूर ठाण्यात फिर्याद दिली. सदर प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी दोन दिवस चौकशी केल्यानंतर १८ आॅक्टोबरला आरोपी नानाजी गोविंदा आदे याच्याविरूद्ध अपराध क्र. ३०२८/१४ कलम २९४, ५०६ भादंवि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) आर.एस. नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे समजताच आरोपी फरार झाला. घटनेला १५ दिवस लोटूनही अद्याप आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले नाही. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)