विरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:43 PM2018-05-26T22:43:29+5:302018-05-26T22:43:48+5:30

तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.

Work of Virur Primary Health Center | विरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले

विरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले

Next
ठळक मुद्देनिधीअभावी कंत्राटदाराने केले बांधकाम बंद : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
विरून (स्टे) : तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.
विरूर परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जावून आरोग्य तपासणी करावी लागत होती. त्यामुळे विरूर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता होती. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व्हावे, यासाठी परिसरातील नागरिकांनी शासनाकडे अनेकदा निवेदन पाठविले. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याने विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला. दीड वर्षापूर्वी बांधकाम सुरू झाले. पण, सहा महिन्यांपासून निधीअभावी बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली.
विरूर येथे पोलीस ठाणे आहे. या विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता भासते. आरोपींना आरोग्य केंद्रात वैद्यकीय परीक्षणासाठी आणावे लागते. मात्र, सुविधा नसल्याने विरूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते.
हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने पोलीस कर्मचाºयांवर मानसिक तणाव असतो. १९९४ मध्ये विरूर पोलीस ठाणे आणि जवळच असलेल्या माकडी रेल्वे स्थानकावर नक्षल्यांनी हल्ला केला होता. या परिसरात आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांची संख्या बरीच आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणे परवडत नाही. सर्व उपचार शासकीय आरोग्य केंद्रावरच अवलंबून असतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला दीड वर्षापूर्वीच सुरुवात झाली. काही महिने वेगाने बांधकाम सुरू होते. सध्या आरोग्य केंद्राचे केवळ अर्धे बांधकाम शिल्लक आहे. आतापर्यंत पूर्ण केलेल्या बांधकामाचे मोजमाप करून निधी द्यावा, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने बांधकाम बंद ठेवले आहे. निधीच्या कमतरतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. लोकप्रतिनिधींनी विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी उर्वरित निधी मंजूर करण्यास शासनाने पाठपुरावा करावा, अशी अशी मागणी केली जात आहे.
परिसरातील ३५ गावांमध्ये नाराजी
विरूर परिसरातील अनेक गावांत प्रामुख्याने शेती करणाºया कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे. विरूर (स्टे.) हे गाव परिसरात सर्वात मोठे असून येथे आठवडी बाजार भरतो. वन कार्यालय, रेल्वे स्थानक, विद्यालय, महाविद्यालय, पोलीस ठाणे आहे. या गावाशी सुमारे ३५ ते ४० गावांचा संपर्क येतो. परंतु विरूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील शेकडो गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. शासनाने आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. इमारतीचे ५० टक्के काम पूर्ण झाले. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास बांधकामाला सुरूवात करू.
- जी. पटेल,
कंत्राटदार, चंद्रपूर

Web Title: Work of Virur Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.