महिला सभापतींच्या काळात महिलांचीच कुचंबना
By Admin | Updated: September 9, 2014 00:16 IST2014-09-09T00:16:25+5:302014-09-09T00:16:25+5:30
पोंभुर्णा शहराला मागील २००७ पासून महिला सभापती लाभुनही त्यांच्या कार्यकाळात महिलांची कुचंबना होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने त्यांना फिरणेही अवघड झाले आहे.

महिला सभापतींच्या काळात महिलांचीच कुचंबना
देवाडा खुर्द : पोंभुर्णा शहराला मागील २००७ पासून महिला सभापती लाभुनही त्यांच्या कार्यकाळात महिलांची कुचंबना होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने त्यांना फिरणेही अवघड झाले आहे.
पोंभुर्णा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरीक दररोज या शहरात बाजारहाटासाठी येतात. अनेक नागरिक कार्यालयीन कामासाठीही पोंभुर्ण्यात दाखल होतात. शहरात दाखल होणाऱ्या या नागरिकांमध्ये महिलांची संख्या मोठी असते. आपल्या कुटुंबासह त्या शहरात येतात. मात्र शहरासह तालुक्यातील या महिलांसाठी पोंभुर्ण्यात कोणतीच सुविधा नाही. त्यांना साधी लघुशंकेला जाण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे.
महिलांसाठी शहरात काही ठिकाणी लघुशंकेसाठी जे प्रसाधनगृह बांधण्यात आलेले आहेत. मात्र त्याचा उपयोग पुरुषच मोठ्या प्रमाणात करीत असल्याने महिलांची गोची होत आहे. या प्रसाधनगृहांचीदेखील दयनीय अवस्था झाली आहे. येथील बसस्थानकाजवळ मोठे भगदाड पडले असुन त्याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापतीपदी सातत्याने महिला सभापती असुनही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. महिला सभापती झाल्याने तालुक्यातील व शहरातील महिलांना सुरूवातीला प्रचंड अभिमान वाटला. मात्र आता त्याच महिला या महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडताना दिसून येतात.
तालुक्यामध्ये दर आठवड्याला बाजार भरत असतो. त्यामुळे परिसरातील असंख्य महिला बाजारहाट करण्यासाठी याठिकाणी येत असतात. मात्र या परिसरात लघुशंकेसाठी कुठे जावे, असा प्रश्न महिलांना पडतो. अनेकदा महिलांना उघड्यावर लघुशंकेसाठी बसावे लागते. त्यांना लघुशंकेसाठी साधे प्रसाधनगृह नाही. याबाबत संबंधित महिला सभापतींनी आजपर्यंत कुठलीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी या महिलांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड नाराजी होत आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्या तुलनेत सार्वजनिक प्रसाधनगृह अत्यंत अपुरे आहे. येथील बसस्थानक व पंचायत समिती परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन त्याठिकाणी साचलेल्या घाणीमुळे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि बसस्थानकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी काही लोक शौचास करून ठेवतात. त्यामुळे सर्वत्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महिलांना व विद्यार्थीनींना त्याठिकाणी बसणेसुद्धा कठीण झाले असल्याने अनेक प्रवासी बाजुला असलेल्या झाडाचा बसण्यासाठी आधार घेत आहेत. झाडाखाली लोकांची गर्दी होत असल्याने बसवाहकांना त्या ठिकाणावरून एस.टी. बस फिरविताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही समस्या याठिकाणी गेल्या वर्षापासून सुरू आहे आणि गेल्या वर्षांपासून येथील पंचायत समितीवर महिला सभापतीपदी विराजमान आहेत. तरीही महिलांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
महिलांसाठी प्रसाधनगृह आवश्यक असताना सर्वच महिला पदाधिकारी उदासिन आहेत. त्यांना साधी समस्या सोडविता आली नाही. एकाही महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांकरिता शहरात साधी प्रसाधनगृहाची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे महिलांमध्ये असंतोष आहे. (वार्ताहर)