महिला म्हणतात, आम्हालाही अटक करा !
By Admin | Updated: July 17, 2014 23:59 IST2014-07-17T23:59:02+5:302014-07-17T23:59:02+5:30
तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत हद्दीतील अमितनगर वस्तीत जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन मन विषन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांकडून मांत्रिक

महिला म्हणतात, आम्हालाही अटक करा !
पिंपळकर हत्याकांड : मांत्रिकाच्या शोधार्थ पोलीस आंध्रप्रदेशात
बल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत हद्दीतील अमितनगर वस्तीत जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन मन विषन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांकडून मांत्रिक शंकर पिंपळकरांचे हत्याकांड घडले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र आम्हालाही अटक करा, अशी भूमिका गावातील महिलांनी कायम ठेवल्याने पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. गावकऱ्यांचे माथे फिरवणाऱ्या आंध्रप्रदेशातील ‘त्या’ मांत्रिकांच्या टोळीच्या शोधार्थ पोलिसांचे पथक गेल्याची माहिती आहे.
अमित नगर येथील मांत्रिक शंकर पिंपळकर यांचा शनिवारच्या मध्यरात्री जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी म्हणून उपसरपंच राकेश बहुरिया, सुनिल बहुरिया, अनिल बहुरिया, कान्हु बहुरिया व राजु चव्हाण यांना अटक करुन पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
यामुळे अमितनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मागील तीन दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांच्या मनात विषाची पेरणी आंध्रप्रदेशातील मांत्रिकाच्या टोळीने केली. यामुळेच गावकरी शंकर पिंपळकर व त्यांची महिला सहकारी यांच्याविषयी कलुषित भावना बाळगून होते.
अंधश्रद्धेच्या चक्रव्युहात गुरफटलेल्या अमितनगरवासियांनी तेथील मांत्रिकाचा व त्याच्या महिला सहकार्याचा काटा काढण्याच्या बेताला आंध्रप्रदेशातील मांत्रिकाच्या टोळीने खतपाणी घातले. परिणामी गावकऱ्यांच्या मारहाणीत शंकर पिंपळकर यांना जीव गमावण्याची पाळी आली. यावर गावातील बहुसंख्य महिलावर्ग मांत्रिकाला आम्ही मारले, परंतु अटक आमच्या कार्यकर्त्यांना केली, म्हणून पोलीस प्रशासनावर दोषारोप करीत आहेत, आंध्रप्रदेशातील ‘त्या’ मांत्रिकाच्या टोळीने गावकऱ्यांना चेतवल्यामुळे शंकर पिंपळकर यांचे हत्याकांड घडून आल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)