राजुरा : माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील भारी येथील रहिवासी निर्मला रामचंद्र बावणे (२२) हिला प्रसुतीनंतर अचानक डायरीयाने ग्रासले. तिला भारी उपकेंद्रातून पाटणस्थित प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गडचांदूरस्थित ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथेही महिलेची गंभीर स्थिती पाहून चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले. या प्रकारामुळे तिला वेळेवर योग्य उपचार मिळू शकला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘रेफर टू’ अशी चालढकल केल्यामुळे चंद्रपूरच्या सार्वजनिक रुग्णालयात वाहनातच तिचा मृत्यू झाला.भारी येथील निर्मला बावने हिची पहिली प्रसुती भारी येथील आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकेने ३ आॅगस्टला दुपारी २ वाजता केली. त्यानंतर तिला बाळासह घरी पाठविण्यात आले. रात्री ११ वाजता प्रसुत महिलेस अचानक डायरिया झाला. तेव्हा भारी उपकेंद्रातील परिचारिकेने उपचार करुन प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे रेफर केले. भारी येथे रुग्णवाहीका नसल्यामुळे जिवती येथील आरोग्य केंद्रातील फोन नंबर १०८ व १०२ वर कळवून रुग्णास नेण्यासाठी रुग्णवाहीका पाठविण्यास सांगण्यात आले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. शेवटी रुग्णाची स्थिती पाहून गावातील अॉटोमध्ये तिला पाटण येथील प्रा.आरोग्य केंद्रात रात्री १ वाजता दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. येथे रात्री ३ वाजता पोहोचताच रुग्णाची स्थिती व रात्रीची झोपमोड पाहता तिला चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले. पहाटे पाच वाजताच्या दरम्यान चंद्रपूर रुग्णालयात येताना जवळच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रत्येक ठिकाणी तिच्यावर केवळ प्राथमिकच उपचार करण्यात आला. तिच्यावर पाटण व गडचांदूर येथील रुग्णालयात योग्य उपचार होणे आवश्यक होते. परंतु याकडे लक्ष दिले नाही.(तालुका प्रतिनिधी)
‘रेफर टू’च्या प्रवासात महिलेचा मृत्यू
By admin | Updated: September 4, 2014 23:41 IST