चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 18:43 IST2019-12-24T18:42:43+5:302019-12-24T18:43:25+5:30

सुलोचना हरी चौधरी (५०)असे मृतक महिलेचे नाव आहे.

Woman killed in tiger attack in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे वाघाच्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी साडेचार वाजता उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुलोचना हरी चौधरी (५०)असे मृतक महिलेचे नाव आहे. शेतातील धानाची मळणी संपल्याने सुलोचना खळा साफ करण्यासाठी मंगळवारी साडे अकरा वाजताचे दरम्यान शेतावर गेली होती. खळा साफ करीत असतांनाच सुलोचनावर वाघाने हल्ला करून ठार केले.
बराच वेळ झाला तरी सुलोचना घरी आली नाही म्हणून पती हरी शेतावर गेला असता खळ्यावर फक्त सूप, टोपला आदी साहित्य दिसून आले. मात्र, सुलोचना दिसली नाही व खळ्यात रक्त सांडलेले दिसून आल्याने पती हरीला शंका आली. लागलीच त्याने गावात ही माहिती दिली. लगेचच गावातील नागरिक घटनास्थळाकडे रवाना झाले. शोधाशोध केली असता खळ्यापासून २०० ते २५० मीटरवर सुलोचनाचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, या घडलेल्या प्रकाराची माहिती वनविभागास देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड चमूसह घटनास्थळाकडे रवाना झाले. वनविभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीड ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला.
 

Web Title: Woman killed in tiger attack in Chandrapur district

टॅग्स :Tigerवाघ