"तुझी बातमी प्रकाशित करू.. " पत्रकार असल्याचा धाक दाखवून विधवा महिलेकडून एक लाखाची खंडणी
By परिमल डोहणे | Updated: November 6, 2025 19:57 IST2025-11-06T19:20:29+5:302025-11-06T19:57:11+5:30
चार पत्रकारांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई

"We will publish your news.." A widow woman threatened by journalists and demanded a ransom of one lakh rupees.
चंद्रपूर :पत्रकार असल्याचा धाक दाखवत एका असहाय विधवा महिलेकडून एक लाख रुपये खंडणी वसूल करणाऱ्या पत्रकारांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी गुरुवारी गजाआड केलं आहे.
राजु नामदेवराव शंभरकर ( ५७) चंद्रपूर, कुणाल यशवंत गर्गेलवार (३७) चंद्रपूर, अविनाश मनोहर मडावी (३३) उमरेड, राजेश नारायण निकम (५६) आग्रा असे अटकेतील पत्रकारांचे नाव आहे.
५ नोव्हेंबर रोजी या टोळीने एका विधवा असाह्य महिलेला "तू अवैध काम करतेस, तुझी बातमी प्रकाशित करू" अशी धमकी देत बातमी थांबविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकीही देत जबरदस्तीने खंडणी घेतल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३०८(५), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली.
तपासादरम्यान हे सर्व जण विविध न्यूज पोर्टल, दैनिके आणि टीव्ही चॅनेलशी संबंधित असल्याचा दावा करून जिल्ह्यात फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांची ओळख पटवून एकामागोमाग चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस तपासात या टोळीचे आणखी दोन साथीदार असल्याचेही निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, निलेश वाघमारे, हनुमान उगले, पोअं. जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्लवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे आदींनी केली.