--------
२. हेल्पिंग हॅण्ड हिरकणी कक्ष, बल्लारपूर
बल्लारपूर येथील हेल्पिंग हॅण्ड हिरकणी कक्षातर्फे गरजवंतांना मोफत जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत. कोरोनामुळे गोरगरिबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोनाची बाधा झाल्याने गृहविलगीकरणात असल्याने घराबाहेर पडणे कठीण असल्याने दोन वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हिरकणी कक्षाच्या डॉ. मंजूषा कल्लूरवार, स्नेहा भाटिया, सिमरण सय्यद, रोहणी नंदगीरवार, संजना मूलचंदानी आदी पुढाकार घेत दररोज ५० च्या जवळपास भोजनाचे डबे पुरवीत आहेत.
-------
विठ्ठाई सामाजिक संघटना
चंद्रपूर येथील विठ्ठाई सामाजिक संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवीत असते. कोरोनाकाळातही ही संघटना सामाजिक कार्य करीत आहे. कोविड रुग्णालयात येणाऱ्या गरजूंना माहिती देणे, त्यांना आवश्यक असलेला औषधपुरवठा करणे, आवश्यकता भासल्यास त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी या संघटनेचे अध्यक्ष महेश काहीलकर धडपडत आहेत. संघटनेने रुग्णालयासमोरच पाणपोई सुरू केली असून, हजारो रुग्णांची तृष्णा भागवीत आहे.
-------
महेंद्र पाल
घुग्घुस येथील जि. प. उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे कार्यरत शिक्षक कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवणाचा डबा पुरवीत आहेत. कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे जेवणासाठी हाल होत आहेत. त्यामुळे महेंद्र पाल यांनी मोफत अन्नदान वितरण सुरू केले आहे. मागील दहा दिवसांपासून ते शहरातील कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे पोहोचवीत आहेत. सोशल मीडियावर याबाब मेसेज पसरताच अनेक जण त्यांना स्वत: भम्रणध्वनी करीत आहेत. आपले शैक्षणिक काम बजावून ते भोजनदान करीत आहेत.