चंद्रपूर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट
By Admin | Updated: December 6, 2014 22:44 IST2014-12-06T22:44:19+5:302014-12-06T22:44:19+5:30
चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकऱ्यांसमोर आतापासून

चंद्रपूर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट
रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकऱ्यांसमोर आतापासून सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला असला तरी उद्योगांकडून पाण्याचा उपसा सुरूच असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढे जिल्ह्यात पाणी प्रश्न तोंडचे पाणी पळविणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली. सुमारे तीन ते चार वेळा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुरासोबत वाहून गेल्या. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. मागील वर्षीच हातचे असले नसले हिरावून घेतल्याने यावेळी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. या आशेवरच शेतकऱ्यांनी यंदा मशागतपूर्व शेतीची कामे केली. सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली.
अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली.
यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. नलेश्वर, चंदई, लभानसराड व दिना सिंचन प्रकल्प तर जवळजवळ कोरडेच पडले आहेत. जिल्ह्यातील ११ धरणापैकी इरई, अमलनाला व डोंगरगाव प्रकल्प सोडले तर इतर जलसाठ्या ३० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. अमलनाला आणि डोंगरगाव प्रकल्पातही भरपूर पाणी नाही.
या ठिकाणीही ५० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातही अद्याप संभाव्य पाणी टंचाईबाबत आराखडा तयार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढे जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.