रबीच्या आशेवर अवकाळी पाणी
By Admin | Updated: March 1, 2016 00:34 IST2016-03-01T00:34:49+5:302016-03-01T00:34:49+5:30
यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

रबीच्या आशेवर अवकाळी पाणी
घुग्घुसमध्ये गारपीट : ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
चंद्रपूर : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागला. कमी पावसामुळे पिके नष्ट होऊन उत्पन्नात कमालीची घट आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रबी हंगामावर आशा होती. मात्र पीक हाती येण्याच्या तोंडावर अवकाळी पावसाने रबी हंगामातही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी फेरले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. घुग्घुस येथे रविवारी रात्री गारपीट झाली. तर सोमवारी ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे.
शनिवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चंद्रपुरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. चिमूर, बल्लारपूर, सावली, नागभीड या तालुक्यातही शनिवारी रिमझीम पाऊस झाला. मात्र त्यानंतरही ढगाळ वातावरण दूर न झाल्याने पाऊस येण्याची शक्यता कायम होती.
सोमवारी सिंदेवाही, सावली तालुक्यातील गेवरा, जिवती तालुक्यातील पाटण, गडचांदूर, घुग्घुस व ब्रह्मपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीत पून्हा पाऊस झाला. सिंदेवाही येथेही सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले. वादळामुळे अनेक विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. आठवडी बाजारातील दुकानदारांनाही वादळामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक हाती येण्याच्या स्थितीत असून लाखोरी, तूर, हरभरा, गहू आदी रबी पिके कापणी करून शेतात ढीग करून आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. चार दिवसांपासूनच चंद्रपूरसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची भिती शेतकऱ्यांना होती. शनिवारी चंद्रपुरात तर रविवारी व सोमवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (लोकमत चमू)
बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीचा कळस कोसळला
चिमुरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या वादळाचा घोडा यात्रेत सहभागी यात्रेकरूंना बसला. अनेक दुकानाचे पत्रे उडाले तर काही दुकानांमध्ये पाणी शिरले. घोडायात्रेसाठी बालाजी मंदिराची प्रतिकृती असलेले थर्मोकोलचे मंदिर उभारण्यात आले होते. मात्र वादळामुळे या मंदिर प्रतिकृतीचा कळस जमीनवर कोसळला.
ब्रह्मपुरीत विजांचा गडगडाट
सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी शहरात तसेच परिसरातील गावांमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ५ हजार ८७८ हेक्टरवर यावर्षी रबी पिकांची पेरणी झाली आहे. यात गहू, हरभरा, उडीद, मुंग, लाखोरी आदी पिकांचा समावेश आहे. मात्र अवकाळी पावसाने या पिकांना मोठा फटका बसला असून गव्हाची शाईनिंग व उतारीवर फरक पडण्याची शक्यता आहे.
झाडे कोसळल्याने मार्ग बंद
सोमवारी सायंकाळी चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, भिसी, मूल, सावली या तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. चिमूर तालुक्यातील चिमूर- सिंदेवाही, नेरी- मोटेगाव- सिंदेवाही, नेरी- नवरगाव या मार्गावर वादळामुळे झाडे कोसळल्याने हे मार्ग बंद झाले. मूल तालुक्याला वादळाचा तडाखा बसला तर गोंडपिंपरी, सावली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
घुग्घुसात गारपीट, वीज पुरवठा खंडीत
रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घुग्घुस येथे गारपीटीसह पाऊस झाला. यावेळी वादळाचा प्रवाहही जास्त होता. त्यामुळे घुग्घुस शहराचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झाला होता. जिवती, गडचांदूर येथेही वादळी पाऊस झाल्याने वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.